नगरमध्ये साडेपाच टन मांगूर मासे जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

देशभर वाहतूक व विक्रीस बंदी असलेल्या साडेपाच हजार किलो मांगूर माशासह 1 आयशर टेम्पो असा 28 लाख 25 हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणात पश्चिम बंगालमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. नगर-सोलापूर रोडवरील रुईछत्तिशी शिवारात ही कारवाई करण्यात आली.

 दीपनकर परेश देबेनाथ (30), अल्लाद्दीन जायनाल रपतान अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

 सोलापूरहून नगरकडे विक्री व वाहतूक बंदी असलेले मांगूर जातीचे मासे घेऊन टेम्पो येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी रुईछत्तिशी शिवारात आपल्या पथकास कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने रुईछत्तिशी शिवारात सापळा लावला असता त्यांना संशयित टेम्पो येताना दिसल्याने त्यांनी देबनाथ व रपतान यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर दोघांनी टेम्पोमध्ये सोलापूरहून मांगूर जातीचे जिवंत मासे भरून ते मध्य प्रदेशातील इंदौर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.

 पथकाने टेम्पोची तपासणी केली असता, टेम्पोत विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेले मांगूर जातीचे 8 लाख 25 हजार रुपयांचे साडेपाच हजार किलो मासे आढळून आल्याने पथकाने दोघांसह 20 लाखांचा टेम्पो व साडेपाच हजार किलो मांगूर मासे असा 28 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक संतोष लोंढे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.