उरणच्या चार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोप्रोलीमध्ये सर्वाधिक उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

उरण तालुक्यात होणाऱ्या चार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचे चित्र स्पष्ट झाले असून मोठीजूई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी कुणीही अर्ज भरला नसल्यामुळे येथे सरपंच पदाची निवडणूक होणार नाही. कोप्रोली ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी सर्वाधिक 5 उमेदवार आहेत, विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंचासाठी तीन तर हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतीत दोन उमेदवार रिंगणात आहेत.

उरण तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणूका 26 सप्टेंबरला होणार आहेत. यामध्ये राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या आघाड्या झाल्या आहेत. कोप्रोली ग्रामपंचायतीच्या 12 सदस्यांसाठी 32 उमेदवार आहेत. तर सरपंच पदासाठी 5 उमेदवार असून खरी लढत शेकाप-काँग्रेस आघाडी, शिवसेना आणि भाजप यांच्यात होणार आहे. मोठीजूई ग्रामपंचायतीच्या 12 जागांसाठी 20 उमेदवार असून 1 उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदिवासीसाठी राखीव झाल्याने व तेथे त्या प्रकारातील उमेदवार नसल्याने येथे कुणीही निवडणूकीसाठी अर्ज भरला नाही. येथे शेकाप आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. हनुमान कोळीवाडा येथे 9 जागांसाठी 10 उमेदवार असून चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सरपंच पदासाठी येथे दोन उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर विंधणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या 15 जागांसाठी 19 उमेदवार असून 6 जागी बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. तर सरपंच पदासाठी येथे तिरंगी लढत होणार आहे. उरण तालुक्यातील या चार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप पहिल्यांदाच या चारही ग्रामपंचायतीत निवडणूक लढवणार आहे.