कसबा पेठेत पुर्ववैमनस्यातून पाच दुचाकी पेटविल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

भावावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून कसबा पेठेत गाड्या पेटवून दिल्याचा प्रकार कसबा पेठेतील माळवदकर गल्ली येथे घडला. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अल्पवयीन मुलासह दोन सरईत गुन्हेगारांना अटक केली आहे.

जय उर्फ नुन्या राजेश भोसले (वय २५), ऋतिक संदीप वैराट (वय २०, दोघे रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मंदार कराडे (वय २२, रा. कसबा पेठ) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मुजुमदार बोळात सिद्धिविनायक बिल्डींगसमोर बुधवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास कोणी तरी दुचाकींना आग लावली. यामध्ये सर्व गाड्या जळून खाक झाल्या. फरासखाना पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये नुन्या भोसले, ऋतिक वैराट आणि एका अल्पवयीन मुलाचे नाव समोर आले.

पोलिसांनी या तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशी सुरू केल्यावर नन्याने गाड्या जाळल्याची कबुली दिली. दोन आठड्यापूर्वी शनिवार वाड्यावर नन्या भोसलेचा भाऊ शिवम भोसले आणि त्याचे मित्र वाढदिवस साजरे करत होते. त्यावेळी ओंकार रोमन आणि त्याच्या साथिदारांनी पुर्ववैमनस्यातून शिमववर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. रोमन हा सध्या कारागृहात आहे. या घटनेचा बदला घ्यायचा म्हणून नन्या भोसलेने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने रोमन याची गाडी मध्यरात्री पेटवून दिली. त्यामध्ये मंदार कराडे आणि इतरांच्याही दुचाकी जळून खाक झाल्या. उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी अमोल सरडे, अमेय राणा, आकाश वाल्मीकी, शंकर कुंभार यांनी नन्या आणि अल्पवयीन मुलला त्वरीत शोधून काढले.