
अलिबागची सहल करून घरी परतत असताना लातूरच्या पाच तरुण बाईकस्वारांवर काळाने घाला घातला. खालापूरजवळील बोरघाटात रस्त्याच्या कडेला बाईक लावून उभ्या असणाऱया या तरुणांवर गोण्यांनी भरलेला भरधाव टेम्पो उलटल्याने जागीच चिरडले गेले. या भीषण अपघातात त्यांचा एक मित्र सुदैवाने बचावला आहे.
प्रदीप चोले (38), अमोल चिलमे (30), नारायण गुंडाळे (28), गोविंद नलवाड, निवृत्ती ऊर्फ राम गुंडाळे (29) अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर बालाजी भंडारे (35) हा तरुण या भीषण अपघातातून बचावला. हे सर्व तरुण मूळचे लातूर जिह्यातील वंजारवाडी येथील असून ते पुण्याच्या तळेगाव एमआयडीसीमध्ये कामाला होते. विकेण्डची सुट्टी असल्याने हे सहाजण पुण्याहून अलिबागला सहलीसाठी आले होते. रविवारी रात्री ते सहल करून मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून परतत असताना खालापूरजवळील बोरघाटात लघुशंकेसाठी थांबले. रस्त्याच्या कडेला बाईक लावून ते उभे असतानाच अचानक मैद्याच्या गोण्यांनी भरलेला ओव्हरलोड टेम्पो त्यांच्यावर उलटला. टेम्पोमधील गोण्यांच्या ढिगाऱयाखाली त्यातील पाचजण गाढले गेले.
देवदूत मदतीला धावले
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस , खोपोली पोलीस ठाण्याच्या पथकासह स्वयंसेवी देवदूत टीम मदतीसाठी धावली. रात्रीच्या अंधारातच या पथकांनी ढिगाऱयाखाली अडकलेल्यांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्या पाचही जणांचा मृत्यू झाला होता.
तीन महिन्यांतील दुसरा भीषण अपघात
तीन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी खासगी वाहतूक करणारी आराम बस पहाटे खोपोलीकडे येत असताना पलटी होऊन 6 प्रवासी मृत्युमुखी पडले होते. तर 28 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा त्याच ठिकाणी हा भीषण अपघात घडला असून पाचजणांचा बळी गेला आहे.
बॅरिकेड्स हटवले कोणी?
वाढत्या अपघातामुळे पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बॅरिकेड्स लावून पूर्णपणे बंद केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी खासगी बस वाहतूकदारांनी लोणावळ्याकडे जाणाऱया मार्गाचे बॅरिकेड्स तोडून पुन्हा वाहतूक सुरू केली. त्यामुळे पोलीस आणि खासगी बस वाहतूकदारांचे साटेलोटे असल्याची चर्चा आहे.




























































