पंचतारांकित ठगबाज गजाआड, हॉटेलमध्ये फुकटात ऐशोआराम

पंचतारांकित हॉटेलमध्ये फुकटात ऐश करून बिल न देता पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या थापाड्यास वेदांतनगर पोलिसांनी अटक केली. या ठगबाजाने यापूर्वी राम आणि अजंता अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये वास्तव्य करून बिल न देता पळ काढल्याचे उघडकीस आले आहे.

तामिळनाडू येथील जॉन ज्ञानप्रकाश व्हिमसेंट हा दोन दिवसांपूर्वी रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल किंग्जमध्ये थांबला होता. अॅग्रिकल्चरल कान्फरन्स घेण्यात येणार असल्याचे त्याने हॉटेल व्यवस्थापकाकडे अॅडव्हान्सदेखील जमा केला नव्हता. हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना त्याने महागडी दारू आणि दररोज 20 ते 25 सिगारेटची मागणी केली. सिगारेट आणून दिल्यानंतर त्याने पुन्हा महागड्या दारूची मागणी केली. दारूसाठी पैशाची मागणी केली असता त्याने पैसे नसल्याचे सांगितले.

काउंटरवर पैसे जमा न केल्याने व्यवस्थापकाचा संशय बळावला त्याने इंटरनेटवर आधार कार्डची तपासणी केली असता त्यांना कार्डवर दुसरेच नाव दिसून आले. थापाड्या असल्याचे समजल्यावर हॉटेलमालक चौधरी यांनी वेदांतनगर पोलिसांना माहिती दिली. यावरून पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या पथकाने जॉन यास ताब्यात घेतले. या ठगबाज जॉन याने यापूर्वीदेखील शहरातील रामा इंटरनॅशनल आणि अजंता अॅम्बेसेडर हॉटेलमध्ये मुक्काम करून बिल न देताच पळ काढला होता. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच या महाठगाविरुद्ध पोलीस ठाणे, कफपरेड, मनिपाल, धारवाड, ओल्ड गोवा येथील पोलीस ठाण्यांतदेखील फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक रोडगे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या