
हिंदुस्थानी हवाई दलाला देण्यात येणारे पाच तेजस लाइट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट पूर्णपणे तयार आहेत, अशी माहिती हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने गुरुवारी दिली. फेब्रुवारी 2021 मध्ये संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या 48 हजार कोटींच्या करारांतर्गत हे तेजस जेट बनवण्यात आले आहेत.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे अध्यक्ष डीके सुनील यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पाच तेजस एमके-1 ए विमाने बनवून तयार झाली आहेत. आम्ही फायरिंग आणि मिसाईल चाचणी पूर्ण केली आहे. आम्ही चालू आर्थिक वर्षात या पाच लढाऊ विमानांना हिंदुस्थानी वायुसेनेकडे सुपूर्द करण्यासाठी संपर्प करत आहोत. याशिवाय आणखी नऊ विमाने तयार केली जात आहेत. या विमानांची टेस्ट उड्डाणे पूर्ण झाली आहेत. या विमानांना अमेरिकी कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) कडून इंजिन मिळाल्यानंतर तत्काळ डिलिव्हरीसाठी तयार केले जाईल. आतापर्यंत आम्हाला जीईकडून पाच इंजिने मिळाली आहेत.
इंजिन पुरवठय़ावरून भविष्यात सकारात्मक स्थितीची अपेक्षा आहे. आर्थिक वर्षासाठी सर्व डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही एचएएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तेजस एमके-1ए हे हिंदुस्थानचे स्वदेशी विकसित हलके लढाऊ विमान आहे.
तेजस एमके-1एची काय आहेत वैशिष्टय़े?
तेजस एमके-1एमध्ये ऑक्टिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्पॅन्ड एरे रडार लावले आहेत. यामुळे एकाच वेळी अनेक लक्ष्यांना ट्रक केले जाते. याची मारक क्षमता खूपच जास्त आहे. तेजसमध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमता आहे.

























































