
महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणपती सणाला कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने 23 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर यादरम्यान पाच हजार जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी बसस्थानकांच्या तिकीट खिडक्या तसेच महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जादा गाडय़ांचे आरक्षण करता येणार आहे. गेल्या वर्षी 4300 जादा गाडय़ा सोडल्या होत्या. यंदा त्यात 700 जादा गाडय़ांची वाढ केली आहे. त्यामुळे गावी जाणाऱया चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मुंबई, ठाणे परिसरातून लाखो चाकरमानी कोकणातील गावी जातात. रेल्वेचे तिकीट सहजासहजी मिळत नसल्याने ‘लालपरी’च्या प्रवासाकडे लोकांचा कल वाढला आहे. प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन एसटी महामंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात पाच हजार जादा एसटी गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा गाडय़ा सुटणार आहेत. प्रवाशांना npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation अॅपद्वारे तिकीट बुपिंग करता येईल. तसेच बसस्थानकाच्या तिकीट खिडक्यांवर आरक्षण करता येणार आहे. गणेशोत्सवात एसटीची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार असून महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक तैनात ठेवले जाणार आहे.
22 जुलैपासून गट आरक्षण सुरू
जादा बसगाडय़ांच्या सेवेत व्यक्तिगत आरक्षणाबरोबर गट आरक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. जादा गाडय़ांमध्येही तिकीट दरात अमृत ज्येष्ठ नागरिकांना (75 वर्षांवरील) 100 टक्के तसेच इतर ज्येष्ठ नागरिक व महिलांना 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. जादा गाडय़ांचे गट आरक्षण 22 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी 5200 जादा गाडय़ा सोडल्या होत्या. त्या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाला.