चित्रपट निर्माता राकेश मेहरा यांना ५ हजार रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

प्रसिध्द चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी कथा चोरून ‘रंग दे बसंती’ या चित्रपटाची निर्मिती केली असल्याचा आरोप कथाकार मुश्ताक मोसीन यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुरडउपाधे यांच्यासमोर दाखल केलेल्या दाव्यात केला होता. न्यायालयाने मेहरा यांना वॉरंट जारी केल्यामुळे ते आज शुक्रवारी, न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी न्यायालयाच्या आदेशाने ५ हजार रुपये दंड जमा करुन यापुढे सुनावणीस नियमित हजर राहण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर न्यायालयाने मेहरा यांचे वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले.

संभाजीनगर येथे राहणारे कथाकार मुश्ताक मोसीन यांनी आपल्या अनेक कथा अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि. (एबीसीएल) मध्ये नोंदणी करून कथेच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या होत्या. राकेश ओमप्रकाश मेहरा हे एबीसीएलचे सदस्य होते. त्यांनी २००६ मध्ये ‘रंग दे बसंती’ आणि २००९ मध्ये ‘दिल्ली -६’ या दोन हिंदी चित्रपटांची निर्मिती करुन प्रदर्शित केले होते. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मितीपूर्वी कथाकार मुश्ताक मोसीन यांची पूर्वपरवानगी घेतली नाही. त्यांनी कथा चोरुन ते दोन्ही चित्रपट निर्माण केले. या दोन्ही चित्रपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली असल्याचा आरोप केला. २०१० मध्ये मुश्ताक यांनी प्रतिवादी राकेश ओमप्रकाश मेहरा आणि यु. टी.व्ही. मालिका निर्माता रॉनी स्व्रूâवाला या दोघांविरोधात दावा दाखल केला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच.एस. पुरडउपाधे यांच्यासमोर या दाव्यावर सुनावणी झाली असता वेळोवेळी मेहरा आणि स्व्रूâवाला हे दोघे गैरहजर राहत असल्यामुळे न्यायालयाने त्या दोघांना नोटीस, समन्स बजावून चौकशीसंदर्भात हजर राहण्याचे आदेश दिले.

वॉरंट बजावण्यात आल्यानंतर मेहरा हे आज शुक्रवारी स्वत: हजर झाले आणि या पुढील सुनावणीस नियमित हजर राहण्याचे अभिवचन न्यायालयास दिले. न्यायालयाने त्यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावून त्यांना बजावण्यात आलेले वॉरंट रद्द केले. वादी मुश्ताक मोसीन यांच्यावतीने अ‍ॅड. मनुलाल पटेल यांनी बाजू मांडली.