
जम्मू-कश्मीरमधील पाच तरुणांचा कुवेतमध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फरीद अहमद, सरफराज अहमद, मोहम्मद खालिद, मुख्तार अहमद अशी मयत चौघांची नावे असून पाचव्या तरुणाची ओळख अद्याप पटू शकली नाही. अन्य एक तरुण अपघातात गंभीर जखमी असून त्याच्यावर कुवेतमध्ये उपचार सुरू आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व तरुण जम्मू आणि कश्मीरच्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या बचनवाली, शिएंद्रा आणि थानामंडी या गावांतील रहिवासी होते. कुवेतच्या महामार्गावर दोन वाहनांची टक्कर झाल्याने भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सर्व जण चांगल्या नोकरीच्या शोधात कुवेतमध्ये गेले होते. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

























































