
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
ते आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी उरणकरांना जिंकले…. होय, हे आहेत परदेशी पाहुणे. आपले लाडके फ्लेमिंगो. गुलाबी थंडीत लाखोंच्या संख्येने हे पाहुणे हजारो किलोमीटरचा प्रवास करून उरणमध्ये धडकले आहेत. दरवर्षी हे फ्लेमिंगो जेएनपीटीजवळील पाणजे खाडीत येतात आणि पाण्यात मनसोक्तपणे विहार करतात. पण चौथ्या बंदरामुळे धडधड वाढली. तसेच मोठय़ा प्रमाणावर भरावही टाकला गेलाय. या पाहुण्यांची शांतता भंग पावल्याने त्यांनी आता घर बदलले असून बोकडविरा खाडी आणि भेंडखळ खाडीवर आपला डेरा टाकला आहे.
निसर्गपेमींना पर्वणी
हिरवीगार झाडी.. खाडीचे स्वच्छ पाणी आणि निळेशार आकाश अशा निसर्गरम्य ठिकाणी त्यांना फुकट घर मिळाले आहे. येथील निसर्गही या पाहुण्यांचा चांगला पाहुणचार करीत असून त्यांची विचारपूस करण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी येत आहेत. या फ्लेमिंगोंना आपल्या मोबाईल तसेच कॅमेऱयात कैद केले जात असले तरी पक्षीप्रेमी आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱयाने त्यांची छबी आपल्या मनाच्या कॅन्व्हासवर उतरवत आहेत.
पाणथळी कमी होतायत
प्लेमिंगोंना आवश्यक असणारे खाद्य पुरेशा प्रमाणात मिळत असल्याने ते उरणच्या भागात येतात. मात्र कमी होत चाललेल्या पाणथळी व पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संख्येत घट होत असल्याने हे पक्षी नवीन आश्रयस्थाने शोधत आहेत. एकीकडे सरकार वाढत्या लोकसंख्येसाठी द्रोणागिरी नोड, उलवे नोडसारखे रेसिडेंशिअल झोन बांधत असेल तर निसर्गाचा विचार करून ‘पाणजे-डोंगरी’ येथील पाणथळींचा विचार करावा, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.




























































