गुजरातमधून आलेल्या राज्यपालांच्या दिमतीला नव्याकोऱ्या गाड्यांचा ताफा, दीड कोटीची नवीन वाहने

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्य सरकारने नव्या राज्यपालांना खूश करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांची नवीकोरी अलिशान वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नव्या राज्यपालांच्या ताफ्यात लवकरच चार महागड्या अलिशान गाड्या दाखल होणार आहेत.

सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रपतींनी आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यानुसार आचार्य देवव्रत यांनी सोमवारी राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांच्यासाठी 1 कोटी 48 लाख 50 हजार 265 रुपये किमतीची चार नवी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. राज्यपालांच्या नव्या वाहन ताफ्यात टोयोटा हायक्रॉस झेडएक्सओ या मॉडेलच्या तीन वाहनांचा समावेश आहे.