ठाण्याच्या खाडीत तरंगते हॉटेल; खाओ, पिओ, मस्त सफर करो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थर्टी फर्स्ट  पिंवा बर्थडे एन्जॉय करण्यासाठी आता तुम्हाला गोव्याच्या समुद्रावर जाण्याची गरज नाही. कारण लेकसिटी असलेल्या ठाण्यातच हा आनंद तोही क्रुझवर लुटता येणार आहे. गायमुखच्या खाडीत मंगळवारपासून तरंगते हॉटेल सुरू होणार असून गार वारा..निळेशार पाणी.. उसळत्या लाटा याचा आनंद घेत आवडीच्या पदार्थांवर ताव मारता येईल. ठाणे महापालिका व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या वतीने हा ‘चविष्ट’ उपक्रम सुरू होत असून पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे.

गायमुख चौपाटी पर्यटन केंद्र म्हणून ठाणे महापालिकेने विकसित  केली असून आता त्यात नव्या क्रुझची भर पडणार आहे.  या अनोख्या हॉटलमध्ये शंभर जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. लोअर व अप्पर डेक असे दोन भाग असून दोन्हीकडे प्रत्येकी 50 जण बसू शकतात. लोअर डेक एसी आहे. ‘द सी क्रुझ’ असे नाव असून एसएसआर मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत हॉटलेची सेवा पुरवली जाणार आहे. लाईट्स, म्युझिक आणि गप्पा अशी मैफल रंगवत जेवणाचा आनंद घेता येईल.

मंगळवारी शुभारंभ

गायमुख चौपाटीवरील या तरंगत्या हॉटेलचे उद्घाटन मंगळवारी सकाळी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून रोज सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत व्हेज व नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेता येईल. त्यासाठी तुम्हाला दोनशे रुपये आधी भरून सीट बुक करावी लागणार आहे. पिझ्झा, पास्ता, सॅलडपासून आवडीचे सर्व खाद्यपदार्थ मिळणार आहेत. या हॉटेलमध्ये जाऊन बच्चे कंपनी  खूश होणार असून बर्थ डे पार्टीचेही आयोजन करता येईल, अशी माहिता ‘द सी क्रुझ’चे रोशन ऑलवेट यांनी दिली.

बाऊन्सर, लाईफ गार्ड

क्रुझवरील हॉटेलमध्ये येणाऱयांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे.  लाईफ गार्ड, बाऊन्सर, सीसीटीव्ही कॅमेरे असा पुरेपूर  ‘बंदोबस्त’ केला आहे. त्यामुळे सुरक्षेचे नो टेन्शन.

सैर करा… सन सेटचाही आनंद घ्या

कोरोनाचे संकट टळल्यानंतर दर शनिवार, रविवारी दोन तास खाडीची सैर करता येणार आहे. त्यासाठी साडेसातशे रुपयांची खिशाला चाट द्यावी लागेल. मात्र ही सैर पैसा वसूल असणार, अशी खात्री आयोजकांनी दिली आहे.