
दिवाळीनिमित्त टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांनी २७ गड-किल्ले साकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या किल्ल्यांमध्ये लोहगड, सिंहगड, खांदेरी, उंदेरी, जंजिरा, पूर्णगड, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, तळगड आदींचा समावेश आहे.
बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस चाललेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये इयत्ता पाचवीपासून ते महाविद्यालयाच्या सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारलेले २७ गड-किल्ले. या किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि स्वराज्याचा इतिहास विद्यार्थ्यांनी जिवंत केला. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, सहकार्याची भावना आणि ऐतिहासिक वारशाबद्दल आवड निर्माण व्हावी हे या मागचे उद्दिष्ट होते.
व्हॉट्सॲप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या जमान्यात ऐरोली सेक्टर ६ मधील मानस सोसायटीतील इयत्ता दुसरी ते नववीच्या बालकलाकारांनी शिवरायांच्या गड-किल्ल्यांचा वारसा जपला आहे. माती, दगड आणि टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून या चिमुकल्यांनी सामूहिक श्रमदानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती साकारली. रोहन सावंत आणि विवेक राव यांच्या मार्गदर्शनाखाली बालकलाकार सर्वश्री कुमार, अर्णव कोडक, ऋवेद ठोके, निविण जॉन, जय गावकर, आयुष्य खाडे, अन्यना बोरळे, अन्वि राणे, संयुक्ता शिंदे यांनी किल्ला बनवण्यासाठी मेहनत घेतली. तसेच या उपक्रमाला दीपाली कोडक आणि वैशाली ठोके यांचेही सहकार्य लाभले.
आकर्षक पणत्या
किल्ले बांधणी स्पर्धा व प्रदर्शनासह पणती रंगविणे आणि आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून आकर्षक पणत्या सजविल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील तयार केले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पालकांनी आणि नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. या उपक्रमांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.























































