मोठ्या शहरांना पुराचा धोका

808

जागतिक हवामानात सतत होणाऱया बदलांमुळे भविष्यात वातावरणात अनेक मोठे आणि विचित्र बदल घडू शकतात आणि त्यातच शहरी भागांतील पायाभूत सुविधांमध्ये देखील सतत बदल होत असल्याने जगातील अनेक मोठय़ा शहरांना पुराचा धोका उद्भवू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. गेल्या नोव्हेंबर 2019 मध्ये युरोपची सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱया इटलीमधली मतेरा शहराला असाच मुसळधार पावसाचा फटका बसला. तेथील बेसिलिकाटा प्रदेशात जोरदार पाऊस पडला. घरे, व्यवसाय आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीचा अंदाज तब्बल 8 दशलक्ष युरोच्या पलिकडे नोंदवला गेला. साल 1950 च्या उत्तरार्धापासून जपानला सर्वाधिक त्रास देणाऱया हागीबिस वादळाने पुन्हा एकदा जपानला तडाखा दिला. संपूर्ण विजेचे जाळे या वादळाने तोडले आणि देशातील बहुसंख्य शहरांमधील पायाभूत सुविधांना पुराचा दणका बसला. अतिवृष्टी, बर्फवृष्टी, वादळाचा जोर आणि समुद्राच्या पातळीची वाढ ही बहुतेकदा नदी व किनारपट्टीच्या पुरामागील मुख्य कारणे असतात. ज्याचा परिणाम शहरी व ग्रामीण भागातील जनजीवनावर होतो. युरोपियन खंडावर पूरपरिस्थितीची टांगती तलवार कायमच असेल, असे युरोपियन पर्यावरण संस्था म्हणते आहे. कारण उष्ण तापमानामुळे आणखी तीव्र पाऊस पडेल आणि कोरडे वातावरणदेखील उष्ण तापमानाच्या काळात आणखी वाढेल. या संस्थेचा असा अंदाज आहे की, युरोपमधील बऱयाच भागांत हिवाळ्यात नेहमीपेक्षा 35 टक्के जास्त मुसळधार पाऊस पडेल, तर दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम युरोपमधील उन्हाळ्याची तीव्रता नेहमीपेक्षा अधिक असेल. हवामानातील हे बदल आणि त्यांच्या परिणामांचा नीट अभ्यास करण्यासाठी युरोपियन युनियनच्या संयुक्त संशोधन केंद्राद्वारे एक मॉडेल विकसित करण्यात येत आहे. ज्याद्वारे गंभीर परिणाम केलेल्या पाऊस आणि वादळ यांचा अभ्यास करून, भविष्यातील संभाव्य हवामानाचा फटका बसणारे प्रदेश अधोरेखीत करता येतील आणि पूर्वतयारीदेखील करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या