संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून उच्चांकी 45 हजार क्यूसेक्स विसर्ग सोडल्याने आज पुन्हा एकदा पुण्यावर पूर संकट कोसळले. मुठेला पूर आल्याने सिंहगड रस्त्यावरील एकतानगर आणि परिसरातील सोसायट्यांना पाण्याचा वेढा पडल्याने 359 नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले. संभाव्य धोका लक्षात घेता लष्कराला मदत कार्यासाठी पाचारण केले.
सकाळापसून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख पेठांसह उपनगरांतील रस्ते जलमय झाले होते. सिंहगड रस्ता, एकता नगरी, पुलाची वाडी येथे रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असल्याने नागरिकांना गुडगाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
नदीकाठ परिसरातील वीजपुरवठा बंद
शहरातील मध्यवस्ती परिसरातील शनिवारी रात्री दहा वाजता खंडित झालेली वीजपुरवठा रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने आली. जवळपास 16 तास वीज गायब झाल्याने मध्यवस्तीतील ग्राहकांना रात्रभर अंधारात काढावी लागली. तर संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
15 महसूल मंडलमध्ये अतिवृष्टी
जिह्यातील 15 महसूल मंडलामध्ये अतिवृष्टी म्हणजेच 65 मि. मी. पेक्षा जादा पाऊस झाला आहे. यामध्ये माले, भोलावडे, निगुडघर, काळे कॉलनी, कार्ला, खडकाळा शिवणे, लोणावळा, वेल्हा, पानशेत विंझर, खेड तालुक्यातील वाडा, कुडे, आंबेगाव यांचा समावेश आहे.
संततधार पावसामुळे एसटीला ब्रेक, रेल्वे स्लो
गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे घाट रस्ता, महामार्ग, लोहमार्गावर पाणी साचले आहे. ताम्हिणी घाट वाहतुकीसाठी बंद आहे. तर बोर घाटात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे पुणे विभागातील एसटीच्या 41 फेऱया रद्द केल्या असून, लोहमार्गावर पाणी साचल्यामुळे रेल्वेसुद्धा स्लो धावत आहे.
खडकवासलातून सोडले 45 हजार क्युसेक्स पाणी
खडकवासला धरणातून सायंकाळी या वर्षातील उच्चांकी म्हणजेच 45 हजार 705 क्यूसेक्स पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आल्याने पुण्यात नदी काठावरील परिसरात पुन्हा एकदा पूर आपत्ती निर्माण झाली. शिवने येथील फूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर विठ्ठलवाडी परिसरातील एकता नगर परिसरातील सोसायटी आणि वसाहती पुन्हा एकदा जलमय झाल्या. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला तसेच ज. श्री. टिळक पुलावरून देखील पाणी गेले.
या भागात शिरले पाणी
मुठा नदीकाठावरील सिंहगड रस्ता परिसरातील एकता नगरी, निंबसनगर, रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, मंगळवार पेठ, मातोश्री रमाबाई आंबेडकर वसाहत (ताडीवाला रोड), येरवडा, शांतिनगर, खराडी आदी नदीकाठच्या भागात पाणी शिरले. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर या प्रशासनाने पुरबाधित परिसरातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर केले होते. रविवारी सकाळी महापालिका प्रशासनाने सनसिटी भाजी मंडई, अनुश्री हॉल येथे नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱयाची सोय केली. रजपूत झोपडपट्टी, पुलाची वाडी, मंगळवार पेठेतील वस्त्यांमधील नागरिकांनाही प्रशासनाने दुसरीकडे हलविले. पाटील इस्टेट वसाहतीमधील 10-20 घरांमध्ये दुपारी पाणी शिरले, त्यामुळे महापालिका प्रशासनाने संबंधित नागरिकांचे बसमधून तातडीने जवळील शाळेमध्ये स्थलांतर केले. दुपारी विठ्ठलवाडीच्या मंदिराकडे जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला. फुलेनगर वस्ती, ताडीवाला रोड, शांतिनगर येरवडा येथील अनेक घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. रविवारची सुट्टी असल्याने आणि प्रशासनाने पुराबाबत वेळीच सतर्क केल्याने नागरिकांना तातडीने उपाययोजना करता आल्या.