
सीना नदीच्या महापुराचा वेढा पडलेल्या माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावचा पाहणी दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. मात्र, आमच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत, असा संताप व्यक्त करीत पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच ओला दुष्काळ जाहीर कधी करणार, या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टोलवाटोलवी केली आहे. दरम्यान, महापुरामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील लांबोटी पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे, तर रेल्वे वाहतुकही ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.
अतिवृष्टी आणि धरणांमधून दोन लाख क्युसेक्सने होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे सोलापूर जिल्हय़ात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे. माढा, मोहोळ, करमाळा, कुर्डूवाडी तालुक्यातील शेत जमिनी, पिपं, घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
आश्वासन नको, मदत द्या
आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायला हवे होते. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिली जात आहे. अद्यापही काही लोक पुरात अडकले आहेत. आम्हाला भेटून वस्तुस्थिती सांगायची होती. पण दोन मिनिटेही त्यांचा ताफा थांबला नाही, अशी व्यथा पूरग्रस्तांनी मांडली आहे.
एनडीआरफने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
उंदरगाव येथे सीना नदीची पाणीपातळी 8 ते 10 फूट कमी झाल्याने बचाव कार्य पूर्ण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, निमगाव, दारफळ, वाकाव, राहुलनगर, तांदुळवाडी या गावांना पाण्याचा विळखा कायम आहे. येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सुरक्षित स्थळी हलविले.
अतिवृष्टीग्रस्तांसाठी राजपत्रित अधिकाऱयांनी दिला एक दिवसाचा पगार
सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकाऱयांनी आपल्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ला देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यावर आलेल्या अस्मानी संकटाला एकजुटीने तोंड देण्यासाठी राज्य शासनाला महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकाऱयांचीदेखील समर्थ साथ राहील, अशी माहिती अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली. तसे पत्र महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पाठवले आहे. बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱयांनीदेखील एक दिवसाचे निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा मनोदय महासंघाकडे व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या लातूर दौरा भाजपकडून हायजॅक
माढा तालुक्यात पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री लातुरात उजनीला आले. मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला भाजपची नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी काsंडाळे केले होते. भाजपच्या नेत्यांनी जे दाखवले तेवढेच मुख्यमंत्र्यांनी पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा औराद शहाजनीला आला. मुख्यमंत्री येणार म्हणून औराद शहाजनीसह तगरखेडा, मानेजवळगा आदी परिसरातील शेतकरी पायपीट करून आले होते. या शेतकऱयांना पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर थांबण्याचे फर्मान सोडले. मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱयांकडे ढुंकूनही पाहिले नाही. नदीकाठावर पाहणी करून मुख्यमंत्री निघून गेले.