चारा व पाणी प्रश्न गंभीर झाल्याने पडेल भावात पशुधनाची विक्री

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

यंदाच्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. जनावरांचा चारा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक पशुपालकांनी पडेल त्या भावात पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर ही जनावरे विक्रीसाठी आणली होती. दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने वाळलेला व कोरडा चारा व विविध ठिकाणावरून तोडून आणलेला ऊस यावरच जनावरांची भूक भागवली जात आहे. त्याचेही दर वाढल्याने पशुधनाची मोठ्या या प्रमाणात परवड होत असल्याने शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने अनेक विहिरी, बोअर कोरडी पडली आहेत. शेत-शिवार ओस पडल्या सारखे झाले असून अवर्षणग्रस्त परिस्थिती उद्भवली आहे. शेतकरी दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे मात्र , जनावरांना चारा मिळत नसल्याने दूध धंदा ही मोडकळीस ठरून पाहत आहे. एकेकाळी कोपरगावची ओळख कॅलिफोर्निया म्हणून होती आता ती पुसत चालली आहे. ज्यांच्या उभ्या फळबागांना पाणी न मिळाल्याने त्या करपून जाऊन तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने तसेच जनावरांसाठी हिरवा चारा लागवड न झाल्याने दुभत्या पशुधनाची भूक ज्वारी, मका, कांदा पात, ऊस आदींवर भागवली जात आहे. कमी उपलब्धतेमुळे तेही महाग झाल्याने शेतकऱ्यांना न परवडणारे झाले आहे. पशुधनासाठी टँकरद्वारे विकत पाणी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कधी नव्हती एवढी दुष्काळाची दाहकता यावर्षी भासत आहे.

सोमवार आठवडे बाजार असल्याने येथील कोपरगाव बाजार समिती आवारातील जनावरांच्या खरेदी-विक्री बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाली. त्यामुळे तालुक्यातील परिस्थिती किती भयावह आहे, हे यावरून दिसून येत आहे. पशुखाद्य व विविध पशु आहार यामध्ये भाववाढ झाल्याने अनेक पशुपालकांनी पशुधनाची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मात्र भावही चांगला मिळत नसल्याने चाऱ्याअभावी जनावरांचे होणारे हाल सहन होत नसल्याने पशुपालकांना कमी भावात जनावरांची विक्री करावी लागत आहे. चौकट जनावरांच्या किमतीत निम्म्याने घट बाजारात जनावरांची मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याने पशुधनाचेही दर उतरले आहेत. एरवी साठ ते सत्तर हजार रुपयांना मिळणारी बैलजोडी पंचवीस-तीस हजार रुपयांना मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या