
सामना प्रतिनिधी । नगर
जिल्हा प्रशासनाकडे दाखल आणखी 23 चारा छावण्यांच्या प्रस्तावांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा मंजुरी दिली असून जिल्ह्यातील चारा छावण्यांची संख्या आता 46 झाली आहे. बुधवारी मंजुरी दिलेल्या चारा छावण्यांच्या प्रस्तावामध्ये पाथर्डी तालुक्यातील 16 प्रस्तावांचा समावेश आहे.
राज्यासह जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याची टंचाईसह तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधनाला मुबलक चारा मिळावा, यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. त्या अनुषंगानेच जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा व चारा टंचाईचा वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला होता. या अहवालाच्या आधारे 25 जानेवारी रोजी चारा छावणी सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती. त्यानुसार मागील महिनाभरापासून चारा छावणी सुरू करण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल होऊ लागले आहे. या प्रस्तावांची तपासणी करताना अटी व शर्तींची पूर्तता करणारे प्रस्ताव मंजूर करण्यात येत असून शनिवारपर्यंत (23 फेब्रुवारी) जिल्ह्यामध्ये 23 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. आता पुन्हा बुधवारी नव्याने दाखल झालेले आणखी परिपूर्ण तेवीस प्रस्ताव जिल्हाधिकार्यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे छावण्यांची एकूण संख्या 46 झाली आहे.

































































