पालघरपाठोपाठ वसईतही ‘हिट ॲण्ड रन’, भरधाव ट्रकने शिक्षिकेला चिरडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरमध्ये दुचाकीच्या धडकेत छायाचित्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच वसईतही हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने शिक्षिकेला चिरडल्याची घटना आज सकाळी शिरसाड नाक्यावर घडली. हा अपघात इतका भीषण होता की शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. स्वीडन गोम्स असे मृत महिलेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका होत्या. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

वसई पश्चिमेतील निर्मळ परिसरात राहणाऱ्या स्वीडन गोम्स या तिल्हेर मस्कर पाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सकाळची शाळा असल्याने त्या नेहमीप्रमाणे घरातून निघाल्या. शिरसाड नाका येथून जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बळराम पालकर, राजेंद्र फंड, विपुल आव्हाले, विशाल विसावे यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. फरार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.