आनंदवनात…

580

>> शेफ विष्णू मनोहर

डॉ. विकास आमटे. बाबांच्या आनंदवनाचा विकास हाच ध्यास. सौर ऊर्जेवर चालणारं भलंमोठं स्वयंपाकघर… साधंच पण सुग्रास अन्न तेथे रोज शिजतं.

विकास आमटे सरांचा आणि माझा संबंध तसा बराच जुना. बाबा आमटय़ांबरोबर माझे वडील, काका दिनानाथ मनोहर यांनी बरेच काम केले आहे. विकास सरांना जेव्हा म्हटलं की, मला तुमच्याबरोबर लंच डेट हवी आहे. तर ते म्हणाले, आनंदवनातच ये! आपण इथे आश्रमातच जेऊ आणि सोबत गप्पासुद्धा मारू. आनंदवनात गेल्यानंतर एका वेगळय़ा जगात गेल्यासारखं वाटतं. तिथे बाबांनी कुष्ठरोग्यांचं नंदनवन फुलवलेलं आहे. त्यात विकास आमटय़ांनी नावीन्याची जोड देऊन भव्य असा आनंदवन प्रकल्प उभा केला आहे. जेव्हा स्वयंपाकघरात गेलो तर स्वयंपाकघर बघून थक्क व्हायला होतं.

एका रांगेत लावलेले डाळीचे, भाताचे, भाजीचे गंज जे संपूर्णपणे स्वंयचलित असलेले ज्यात पाच हजार लोकांचा स्वयंपाक रोज तयार होतो. तिथली एक पद्धत मला आवडली ती अशी लोकांना घर आहेत. पण स्वयंपाक एकाच ठिकाणी तयार होतो, मग तो तुम्ही घरी नेऊन खा किंवा तिथेच खा! आता तर अजून एक तंत्रज्ञान विकसित केलं गेलं आहे ते म्हणजे सोलर ऐनर्जीवर हा स्वयंपाक तयार करतात. आश्रमाचा बाहेर भलीमोठी सोलर डिस्क बघायला आणि तिचं तंत्र समजून घ्यायला मजा येते. बोलत-बोलत आम्ही स्वयंपाक घराजवळच्या डायनिंग टेबलवर बसलो. डायनिंग टेबल म्हणजे लांब लोखंडी टेबल. त्यावर स्वच्छ चादर आंथरलेली, बाजूला दुसऱया एका टेबल्यावर दोन भाज्या, वरण, भात, पोळी, लोणचं व कोशिंबीर असा साधाच जेवणाचा प्रकार. पण अतिशय चविष्ट. कारण जेवणात वापरलेलं धान्य, भाज्या सगळं आनंदवन परिसरातच पिकवलं होतं. आम्ही जेवणाची ताटं वाढून घेतली आणि विकास सरांना मी विचारलं की, तुम्हाला इथे कोणाच्या हातचं जेवण आवडतं? तर ते हसून म्हणाले, आता कोणा-कोणाची नावं घेऊ? आनंदवन परिसरात राहणारी मंडळी हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीने तयार केलेला स्वयंपाक मला आवडतो. तुम्हाला एक गोष्ट सांगावी वाटते ती म्हणजे आनंदवनात कुठेही भेदभाव आढळत नाही. एकच स्वयंपाक सगळय़ांकरिता शिजवला जातो. त्यात आमटे परिवार, त्यांच्याकडे येणारे पाहुणे याशिवाय आनंदवन परिसराला भेट देणारी संपूर्ण भारतभरातील मंडळी यांचा समावेश असतो.

बोलता-बोलता मी त्यांना नेमकं विचारलं की, इथे आता स्वयंपाक कोण तयार करतं? पुढे विकास सर म्हणाले की, आनंदवनात प्रकृती ठीक झाल्यानंतर आनंदवन न सोडणारी बरीच मंडळी आहे की जी आनंदवनात राहून तिथलं काम करतात. कोणी शेतीचं काम करतं, कोणी हिशोबाचं काम बघतं तर कोणी स्वयंपाकाचं कामसुद्धा बघतं. विकास सरांचा स्वभाव तसा रांगडा-अगळपगळ, वैदर्भीय भाषेत म्हटला तर मनमोकळा. कोणत्याही माणसाला मैत्री करावीशी वाटेल असा.

त्यांना व्हेज आवडतं की नॉनव्हेज हा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, मारणार तर नाही, पण कोणी दिलं तर मी खाणार या पठडीतला आहे. दलाई लामा ज्या वेळी आनंदवनात आले होते, त्या वेळी त्यांचे सहकारी म्हणाले की, दलाई लामा स्ट्रिक्टिली नॉनव्हेज खातात तेव्हा मला कोडं पडलं की इकडे बुद्ध आणि नॉनव्हेज हे समीकरण कसं? त्यावर दलाई लामा म्हणाले, आमच्याकडे जमिनीत काही पिकत नाही म्हणून एक याक, एक कुटुंब आणि 1 महिना या तत्त्वावर आमचा जिवनक्रम असतो. याक म्हातारा झाल्यावर त्याला कामी आणतात. एक आठवण आनंदवनातील त्यांनी सांगितली की, आनंदवनात तयार होणारी आमटी इतकी चविष्ट असते की एकदा मुकुंद किर्लोसकरांनी आनंदवनाच्या आमटीवर अर्धा तास भाषण दिलं. त्या वेळी तिथे पु.ल. देशपांडेसुद्धा होते. मुकुंदराव त्यांना म्हणाले, पु.ल. मी दहा मिनिटात येतो… माझं पानं राखून ठेवा… पु.ल. हसून म्हणाले, हे काय संपादकीय पान थोडीच आहे की तुमच्यासाठी राखून ठेवू. तुम्ही या लवकर आणि आमटीचा आस्वाद घ्या.

विकासजींना तिखट फार आवडतं. त्यांच्याकरिता भेट म्हणून कित्येक लोक मिरच्या पाठवायचे… सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी तिकडली एक मिरची पाठवली होती. तिचं नाव होतं ‘झलाकिया.’ ही मिरची साधारण मिरचीपेक्षा 1600 पट अधिक तिखट असते. हिच्यासाठी एक मिरची, एक गाव, एक महिना हे समीकरण लागतं. तर हेमलकसा येथील आदिवासी लोकांकडे माडिया नावाची मिरची येते. तिचं समीकरण एक मिरची, एक महिना, एक कुटुंब असं असतं. या दोन्ही मिरच्यांचे स्वाद विकास सरांनी घेतले आहेत.

घरी नॉनव्हेज चालायचे नाही, पण बाहेर मात्र खायचे. बाकी त्यांच्या आवडी-निवडी विषेश नाहीत. पण मसालेदार, तिखट प्रकार सगळे आवडतात. गप्पांमध्ये वेळ कसा संपला कळलं नाही. उर्वरीत आनंदवन बघायचं होतं म्हणून मी विकास पुरुषाचा निरोप घेऊन तेथून निघालो.

हातसडीचा वांगे भात
साहित्य – 1 वाटी हातसडीचा भात , 2 वाटय़ा चिरलेली वांगी , 4 चमचे आलं-लसूण पेस्ट, मीठ, लिंबू चवीनुसार, 4 चमचे बेसन, पाव वाटी कॉर्नस्टार्च, 4 चमचे चिरलेली कोथिंबीर, खोबऱयाचा किस 4 चमचे.
कृती – हातसडीचा भात म्हणजे पॉलीश न केलेला तांदूळ. 2 वाटय़ा तांदूळ असेल तर 2 वाटय़ा वांगी लांब चिरून त्याला आलं-लसूण पेस्ट, मीठ, लिंबू चोळून ठेवा. नंतर त्यावर थोडे बेसन व कॉर्नस्टार्च एकत्र करून लावा व कडकडीत तळून घ्या. दुसऱया एका भांडय़ात अडीच वाटी पाणी तापत ठेवून त्यात आलं-लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट, 2-3 चमचे तेल, दही, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर व धुतलेला तांदूळ घालून शिजवा. भात शिजल्यावर त्यावर तळलेले वांग्याचे तुकडे घाला. वरून कोथिंबीर व ओलं खोबरं घालून वांग्याच्या तुकडय़ांबरोबरच भात सर्व्ह करा.

चंद्रपुरी वडा
साहित्य – 2 वाटय़ा भिजलेली चणाडाळ, 2 ंवाटय़ा बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 बारीक चिरलेली मिरची, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे भरडलेले धणे, अर्धा चमचा हळद, तिखट, मीठ चवीनुसार, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, तेल तळायला.
कृती – डाळ भिजवून वाटून घेणे. त्यात सगळे जिन्नस घालून पाण्याच्या हातानी त्याचे गोल वडे करून तेलात हाफ फ्राय करून घेणे. सर्व्ह करते वेळी या गोल वडय़ांना पुन्हा पाण्याच्या हातानी चपटे करून मंद आचेवर डीप फ्राय करा. तळलेल्या मिरचीबरोबर सर्व्ह करा.
टीप – गोल वडा चपटा केल्यानंतर दुसऱयांदा तळल्यामुळे जास्त खुसखुशीत होतो. यातच मेथीच्या सिझनमध्ये हिरवी मेथी घालून करू शकतो.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या