फुटपाथ हे फक्त चालण्यासाठीच, पालिकेचे सुधारित पदपथ धोरण प्रस्तावित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पदपथ किंवा फुटपाथ हे यापुढे खऱया अर्थाने फक्त चालण्यासाठीच असावेत. त्यामुळे यापुढे पदपथांवर कोणत्याही प्रकारचे ‘स्ट्रक्चर’ किंवा ‘स्टॉल’ बनविण्याच्या परवानग्या दिल्या जाऊ नयेत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आजच्या बैठकीत अधिकाऱयांना दिले. पालिकेचे नवीन पदपथ धोरण प्रस्तावित असून त्यात या सूचनेचा समावेश होणार आहे.

तुटलेले, उखडलेले पेव्हर ब्लॉक, वरखाली असलेला भाग, मध्येच बसलेले फेरीवाले, स्टॉल यामुळे फुटपाथवरून चालणे हे अनेकदा मुश्कीलच असते. हे पदपथ चालण्यासाठी सोयीचे, सलग, समतल व सुकर असावेत यासाठी महापालिकेने स्वतंत्र पदपथ धोरणाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू केली आहे. त्यात आता आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. पदपथ धोरणाची अंमलबजावणी करीत असताना लक्षात आलेल्या बाबी, आव्हाने व समस्या लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता सुधारित पदपथ धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार इथून पुढे केले जाणारे नवीन पदपथ हे सुधारित धोरणानुसार बनवले जाणार आहेत. या नव्या धोरणानुसार पदपथावर यापुढे कोणत्याही स्टॉल, अपंगांचे बूथ, फेरीवाले यांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच कोणत्याही दुकानदार किंवा उपाहारगृह यांना आपल्या मर्जीप्रमाणे पदपथ अडवता येणार नाही.

काय आहे सुधारित धोरणात
– यापुढे सर्व पदपथ ‘सिमेंट काँक्रीट’चे केले जाणार आहेत. तसेच टप्प्याटप्प्याने सध्या असलेल्या ‘पेव्हर ब्लॉक’च्या पदपथांचे रूपांतर हे सिमेंट काँक्रीटच्या पदपथांमध्ये केले जाणार आहे.

– 60 फुटी रुंदी असणाऱया रस्त्याचे पदपथ हे ‘पेव्हर ब्लॉक’चे असल्यास ते आता नवीन धोरणानुसार ‘सिमेंट काँक्रीट’चे केले जाणार असून त्यावर ‘मार्बल चिप’चे फिनिशिंग किंवा ‘ब्रुमिंग टेक्श्चर’ असेल.

– तर 90 फूट रुंदी असणाऱया रस्त्यांचे पदपथ आणि दोन मीटरपेक्षा अधिक रुंदी असणारे पदपथ हे ‘स्टेन्सिल काँक्रीट’ किंवा ‘सिमेंट काँक्रीट’चे असतील. तसेच त्यावरही ‘मार्बल चिप’चे फिनिशिंग किंवा ‘ब्रुमिंग टेक्श्चर’ असेल.