डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गप्पी आणि मॉस्क्युटो फिशची पैदास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेंग्यूसारख्या साथीच्या रोगांनी शहरातील नागरिक त्रस्त आहेत. या आजारांवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. परंतु त्या अपुऱ्या पडत असून अद्यापही डेंग्यू आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत शहराला साथ रोगांपासून मुक्त करणारी अभिनव संकल्पना नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी बसवेश्वर चौकात राबवली आहे. या योजनेतून जलसाठ्यामध्येच डासांचे निर्मूलन करणाया माशांची पैदास केली जाणार आहे.

अत्यंत कमी खर्चात परिणामकारक उपाय या माध्यमातून केला जाणे शक्य आहे. परदेशात अत्यंत यशस्वी ठरलेली ही योजना लातूरात कव्हेकर यांनी पहिल्यांदाच राबवली असून ती दिशादर्शक ठरणारी आहे. दहा दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून राहिले तर त्या पाण्यात डासांची पैदास होते. डासामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे साथरोग पसरतात. पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे पाणी अनेक ठिकाणी साठवून त्यातून अशा डासांची उत्पत्ती होत असल्याने साथरोग पसरतात. अशाच साथरोगांना लातूरकर सध्या तोंड देत आहेत. यातून बाहेर पडण्यासाठी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या प्रभागात असणाऱ्या या महात्मा बसवेश्वर कारंज्याच्या भोवताली जे पाणी साठून राहते त्यात गप्पी मासे आणि गँबुसिया अर्थात मॉस्क्युटो फिश सोडले आहेत .हे दोन्ही मासे डासांची अंडी आणि आणि लारवा खाऊनटाकतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती थांबते.

विशेष म्हणजे लातूरसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात जलसाठे आहेत. विविध मंदिरांच्या ठिकाणी तलाव अथवा तीर्थ आहेत .अनेक ठिकाणी सुशोभीकरणासाठी जलसाठे तयार  करण्यात आलेले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात विहिरी आहेत. नाना-नानी पार्क सारखे तलावही आहेत .अशा तलावांमध्ये हे मासे सोडले तर डासांची उत्पत्ती थांबवता येऊ शकते .यासंदर्भात आपण पालिका आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही अजित पाटील म्हणाले . दक्षिण आशियातील अनेक देशांत विशेषतः कंबोडिया, सिंगापूर ,फिलिपाईन्स येथे हा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे .भारतात दिल्ली व बेंगलोर येथे हा प्रयोग करण्यात आलेला आहे .कंबोडिया व सिंगापूरमध्ये तर प्रशासनाने प्रत्येक घरात असे मासे देऊन साथ रोगांवर नियंत्रण मिळवलेले आहे त्यामुळे भविष्यात लातूरातही असा प्रयोग करता येऊ शकतो अशी अजित पाटील यांची संकल्पना आहे .

साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेच्या वतीने बेटिंग, धूर फवारणी सारखे उपाय केले जात आहेत. या उपक्रमामुळे त्या उपाययोजना थांबवण्याची गरज नाही परंतु माशांची पैदास करून नियंत्रण मिळवण्याचा हा प्रयोग पालिकेसाठी ही उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमासाठी अत्यल्प खर्च येतो शिवाय हा जैविक उपाय आहे. त्यामुळे पर्यावरणाची कसलीही हानी न करता आणि जैविक साखळी कायम राखत साथरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. बसवेश्वर चौकात या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका भाग्यश्री शेळके, बालाजी शेळके, संजय गीर, संभाजीराव पाटील, अमर पाटील, अमर सारगे, शशिकांत हांडे, पालिकेचे स्वछता प्रमुख अक्रम शेख आदींची उपस्थिती होती.