श्रावणी सोमवार दर्शनासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट ची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैद्यनाथ

श्रावण मासानिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे. सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर करडी नजर असणार आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी वैद्यनाथ मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काळजी घेतांना दिसत आहे.

१२ ऑगस्ट रविवार रोजी श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून पहाटे वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी सप्तनीक वैद्यनाथास रुद्राभिषेक केला. पहिला श्रावण सोमवार १३ ऑगस्ट रोजी असून १२ ऑगस्ट रविवारी रात्री १२ वाजल्यापासुन प्रभू वैद्यनाथाचे दर्शन सुरु होणार आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी वैद्यनाथ मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त लावण्यात आलेल्या बंदोबस्ताचा आढावा घेतला.

प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होय नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तर्फे पासची सोय करण्यात आली असून पासधारकांसाठी विशेष रांग असणार आहे. हा दर्शन पास १०० रुपयात उपलब्ध होणार आहे. अशी माहिती वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट चे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.

summary…for shravni somvar all temple get ready