मंथन -प्राण्यांसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशिष बनसोडे << [email protected] >>

विविधतेने नटलेल्या निसर्गात वन्य प्राण्यांचे महत्त्व अन्यन्यसाधारण आहे.  वन्य प्राण्यांची संख्या जंगलात व्यवस्थित राहिली तरच निसर्गाचे पा व्यवस्थित राहते, पण काही समाजकंटक शिकारीच्या नावाखाली वन्य प्राण्यांची कत्तल करतात. कधी ताव मारण्यासाठी तर कधी प्राण्यांचे अवयव विकून मालामाल होण्यासाठी हे कृत्य करतात. शिकार करणाऱयांविरोधात वेळीच आवश्यक पुरावे उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होत नव्हती. परिणामी त्यांचे बळ वाढायचे आणि त्याचा परिणाम प्राण्यांची संख्या घटण्यावर व्हायचा. पण राज्य सरकारने नागपूर येथे स्वतचे वन्य प्राणी डीएनए विश्लेषण विभाग सुरू केल्याने हे चित्र आता बदलताना दिसू लागले आहे. या विभागाकडून झटपट अहवाल उपलब्ध होऊ लागल्याने शिकारी कायद्याच्या कचाटय़ात पद्धतशीर अडकू लागले असून जंगलातल्या वन्य प्राण्यांचे संवर्धन करण्यास मदतीचा हात मिळू लागला आहे.

महाराष्ट्र हे निसर्गाने नटलेले राज्य आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, घनदाट जंगल, पर्वतरांगा, जंगलातून वाहणाऱया नद्या आणि अशा या निसर्गाच्या कुशीत वास्तव्य करणारे पशुपक्षी. त्यामुळे अशी निसर्गाची मुक्त उधळण असलेल्या जंगलांची जपणूक करणेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. अर्थात काही समाजकंटक आपल्या स्वार्थासाठी जंगलाची नासधूस, प्राण्यांची शिकार असे नको ते भयानक कृत्य करत असतात.  बऱयाचदा काही माथेफिरू लोक निव्वळ स्वार्थासाठी प्राण्यांची शिकार करतात. अशा शिकाऱयांविरोधात सबळ पुरावे उपलब्ध होत नसल्याने त्यांना कडक शासन होत नव्हते. परिणामी त्याचा प्राण्यांच्या संवर्धन करण्यास आळा बसायचा, परंतु निसर्गाच्या पाचे प्रमुख अंग असलेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत  महाराष्ट्र राज्य खूपच संवेदनशील आहे. शिकार झालेल्या प्राण्यांची इत्थंभूत माहिती व त्याचा अहवाल वेळीच तयार करण्याचे काम केले जाते. शिकार झालीय तो प्राणी जंगलातला आहे की पाळीव याची शहानिशा करणे, त्या प्राण्याची शिकार झालीय की त्याचा नैसर्गिक मृत्यू झालाय, तो प्राणी नेमका कोण आहे याचा वन्य जीव डीएनए विश्लेषण विभागामार्फत  शोध घेतला जातो.

दोन वर्षांपूर्वी जंगलात मृतावस्थेत सापडलेल्या किंवा अवशेष सापडल्यास त्याचा डीएनए शोधून संबंधित प्राण्याची ओळख व त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी राज्याच्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. कारण दोन वर्षांपर्यंत निसर्गाने वेढलेल्या महाराष्ट्रात प्राण्यांचा डीएनए व त्यांच्या मृत्यूचा शोध घेण्याबरोबर शिकार करणाऱयांविरोधात सबळ पुरावे सादर करण्यासाठी आवश्यक अशी स्वत:ची वन्य प्राणी डीएनए विश्लेषण विभागच नव्हता. हैदराबाद किंवा देहराडून येथील प्रयोगशाळेत प्राण्यांच्या अवशेषांचे साम्पल पाठवावे लागायचे. एका प्रकणात पाच ते आठ सॅम्पल घेऊन त्यांची तपासणी केली जाते. प्रत्येक खेपेला डीएनए तपासण्यासाठी प्रत्येक सॅम्पलला 15 हजार इतका खर्च यायचा. ही प्रक्रिया वर्ष-दोन वर्षेदेखील चालायची. शिवाय त्यासाठी अधिकाऱयांना सतत ये-जा करावी लागायची. हा खर्च व त्रास कमी व्हावा याकरिता राज्याचा स्वतचा वन्य जीव डीएनए विश्लेषण विभाग असणे काळाजी गरज बनली होती. त्यासाठी काही अधिकाऱयांनी कसोशीने प्रयत्नसुद्धा केले होते.

हेर व घोरपड या वन्य प्राण्यांची होणारी शिकार रोखण्यासाठी शिकाऱयांचा बंदोबस्त करणे गरजेचे बनले होते. तेव्हा उपसंचालक डॉ. विजय ठाकरे, वैशाली महाजन व त्यांच्या सहकाऱयांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या दोन्ही प्रकरणांत आवश्यक डीएनए अहवाल प्राप्त केले व त्याचा अहवाल योग्य वेळात न्यायालयात दिला. परिणामस्वरूप हेर व घोरपडींची शिकार करणाऱयांना शासन झाले. त्यामुळे आपल्या राज्यात वन्य प्राणी डीएनए विश्लेषण विभाग अस्तित्वात आलाच पाहिजे ही बाब स्पष्ट झाली. अखेर आाक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र राज्याचा स्वत:चा नागपूर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत वन्य जीव डीएनए विश्लेषण विभाग सुरू केला. हा विभाग सुरू झाल्यामुळे प्राण्यांची डीएनए तपासणी आणि त्याचा अहवाल झटपट मिळविण्यास गती मिळाली. शिवाय प्रचंड होणारा खर्च, अधिकाऱयांचा वाया जाणारा वेळ या सर्वांचीच मोठय़ा प्रमाणात बचत होऊ लागली. महत्त्वाचे म्हणजे या विभागातील अहवालाच्या जोरावर न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्याचे प्रमाण कैक पटीने वाढू लागले. त्यामुळे शिकाऱयांना जरब बसली आणि प्राण्यांची संख्या वाढविण्यास मदत मिळू लागली.

तसे पाहता 1 जानेवारी 2022 पासून नागपूर येथील वन्य जीव डीएनए विश्लेषण विभागाचे खऱया अर्थाने कामकाज सुरू झाले. प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक विभागाचे प्रमुख संजयकुमार वर्मा व संचालिका घुमटकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली उपसंचालक डॉ. विजय ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्या विभागाचे कामकाज यशस्वीरीत्या सुरू आहे. गेल्या दीड वर्षामध्ये न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील वन्य जीव डीएनए विभागात प्राण्यांची 245 प्रकरणे आली. त्यातील 184  प्रकरणांचे अहवालदेखील विभागाकडून देण्यात आले. दीड वर्षातील हे कामकाज समाधानकारक असून खास प्राण्यांसाठी डीएनए विश्लेषण विभाग सुरू झाल्याने येणारी प्रकरणे झटपट निकाली काढण्यात यश मिळू लागले आहे.

जंगलात वास्तव्य करणारे वाघ, बिबटे, चितळ, रानडुक्कर, मोर, हेर, ससा, अस्वल, हत्ती आदी प्राण्यांचे अवशेष सापडल्यानंतर त्यांचा नैसर्गिक मृत्यू झालाय की त्यांची हत्या झालीय ते शोधण्याचे काम आता नागपूर येथील प्रयोगशाळेत झटपट केले जात आहेत. आतापर्यंत या प्रयोगशाळेतून मैलाचा दगड ठरेल अशा प्रकारे संशोधन करून प्राण्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्याबरोबर त्या प्राण्यांची शिकार करणाऱया समाजकंटकांविरोधात न्यायालयात सबळ पुरावे सादर करण्याचे कामदेखील करण्यात आले आहे.

चिखलदऱयात सशासारखा दिसणारा, मात्र टुणूक टुणूक उडय़ा मारत पळणाऱया हेर (HARE) प्राण्याची हत्या करून त्याचे मांस फस्त करण्यात आले होते. त्या ठिकाणी काही दिवसांनी प्राण्याचे अवशेष सापडल्याने खळबळ उडाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर नागपूरच्या प्रयोगशाळेतील संशोधकांनी  त्या ठिकाणी पाहणी केली तेव्हा तेथे ज्या दगडावर मारून प्राण्याचे केस साफ केले होते ते केस, दगडावरील रक्त तसेच त्याला कापण्यासाठी वापरलेला चाकू सापडला होता. त्या तीन बाबींवरून तो प्राणी कोण असेल याचा शोध घ्यायचा होता. हे प्रकरण तसे सोपे नव्हते. तेव्हा अमरावती विद्यापीठातून एका विद्यार्थ्याने हेर या प्राण्याच्या केसांवर पीएचडी केली होती. त्या विद्यार्थ्याकडून त्याचे थिसीस व केसांचे सॅम्पल घेण्यात आले. मग त्याआधारे जंगलात सापडलेल्या केसांचे विश्लेषण केल्यावर ते केस हेर प्राण्याचे असून त्या प्राण्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. तो अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर आरोपींना पकडून त्यांना शिक्षा होण्याचे महत्त्वाचे काम झाले होते. याचबरोबर बऱयाचदा व्हेल माशाची उलटी पकडल्याच्या घटना अधेमधे घडत असतात. ती उलटी कोटय़वधी रुपयांना विकली जाते, पण अनेकदा ती उलटी व्हेल माशाची नसते, तर बोगस उलटी असते. अशा प्रसंगी पोलिसांनी किंवा वन विभागाच्या अधिकाऱयांनी पकडलेली व्हेल माशाची उलटी खरी की खोटी याचाही सोक्षमोक्ष नागपूरच्या प्रयोगशाळेत लावला जातो.

काही वेळेस वाघाची शिकार केली जाते. त्यावेळी त्या वाघाची शिकार कशी झालीय, कोणी केलीय हे शोधणेदेखील आता अधिक सोयीचे बनले आहे. त्याचबरोबर घोरपडीचे तेल शरीरासाठी चांगले असते म्हणून घोरपडीची कत्तल केली जाते. अशी प्रकरणेदेखील प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून निकाली काढण्याचे यशस्वी काम झाले असून त्याची वाटचाल अधिक गतीने सुरू आहे. राज्याकडे स्वतंत्र वन्य जीव डीएनए विश्लेषण विभाग जरी असले तरी तेथे आवश्यक अधिकारी-कर्मचाऱयांची रिक्त पदे डोकेदुखीची बाब ठरत आहे.

जंगलात वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटना मोठय़ा प्रमाणात घडत असतात. अनेकदा प्राण्यांची शिकार केल्यानंतर त्यांचे अवयव विकण्यासाठी शहरी भागात आणले जातात. ते अवयव पोलिसांकडून पकडले गेल्यानंतर ते नेमक्या कुठल्या प्राण्याचे अवयव आहेत याची शिकार कोणी केली याची उकल होणे गरजेचे ठरते. वन्य प्राण्यांची शिकार करणे कायद्याने मोठा गुन्हा आहे. त्यामुळे वन प्राण्यांची शिकार करण्याला मोठी शिक्षा होते, पण बऱयाचदा शिकारी पकडले गेले तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध होत नसल्याने त्यांची न्यायालयातून सुटका होत असे. परंतु आता हे चित्र बदलू लागले आहे.

जंगलातील प्राण्यांचे संवर्धन करणे हे केवळ बोलण्यापर्यंतच मर्यादित राहत होते, पण आता डीएनए विश्लेषण विभागामुळे झटपट अहवाल उपलब्ध होऊ लागल्याने शिकाऱयांना मोठा चाप बसला असून जंगलातील प्राण्यांचे संवर्धन करणे अधिक सोयीचे होऊ लागले आहे. शिकारीमुळे वन्य प्राण्यांच्या घटणाऱया संख्येला रोखता येणे शक्य होऊ लागल्याने निसर्गाचा समतोल राखण्यात यश मिळू लागले आहे.