महाराष्ट्रातील वन क्षेत्रावर शहरीकरण, अतिक्रमणांचा घाला; राज्यातील वन क्षेत्र 2 टक्क्यांनी घटले 

केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे राज्याच्या आकारमानाप्रमाणे 33 टक्के वन क्षेत्र असायला पाहिजे. महाराष्ट्रात वन क्षेत्र कमी असून ते 21 टक्के इतके आहे. त्यातही शहरीकरण आणि अतिक्रमणामुळे राज्यातील वन क्षेत्र घटले आहे. या सर्व गोष्टी शोधून ते पुन्हा वनामध्ये विलीन करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. वन क्षेत्र टप्प्याटप्प्याने 21 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत नेले जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

सरकारी नियमाप्रमाणे भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के वन क्षेत्र आवश्यक आहे, मात्र देशभरात झालेल्या सर्वेक्षणात मात्र महाराष्ट्रातील वन क्षेत्र 2 टक्क्यांनी घटले आहे, असे आढळले आहे. त्याची काय कारणे आहेत. हे रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, असा उपप्रश्न शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर यांनी विचारला. त्याला वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर दिले.

एआय आधारित वॉर्निंग सिस्टम सुरू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मोठी असून हे वाघ आजूबाजूच्या रहिवाशांवर हल्ला करत आहे. या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे जास्त हल्ले होण्याच्या ठिकाणी विशेष गस्त सुरू करा, अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली होती. त्यावर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील गावांमध्ये एआय आधारित वार्ंनग सिस्टम सुरू करण्यात आली आहे. वाघ त्या परिसरात आला की, आपोआपच त्या परिसरात वाघ आल्याची घोषणा लाऊडस्पीकरवरून होते. त्याचबरोबर सकाळी 7 च्या आधी आणि संध्याकाळी 7 नंतर जंगलात जाऊ नका, अशी सूचना रहिवाशांना देण्यात आलेली आहे. लोकप्रतिनिधी, पोलीस, वन खात्याचे कर्मचारी, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून जनजागृती केली जात आहे, अशी माहिती वनमंत्र्यांनी दिली.