चार रानडुकरांची शिकार, तिघांना अटक, वन विभागाची कराडमध्ये कारवाई; नऊ वाहने जप्त

चार रानडुकरांची शिकार करून त्याचे मांस विकणाऱया तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, रानडुकरांचे मांस खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. एक आरोपी फरार झाला आहे. कराड तालुक्यातील हजारमाची येथे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ही क्aाैारवाई करण्यात आली.

सूर्यकांत निवास जाधव ( वय 45, रा. हजारमाची), अविनाश संपतराव पाटील (वय 50, रा. गोवारे), राजेंद्र रामचंद्र भोसले (वय 59, रा. कराड) यांना अटक केली आहे.

वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे रोहन भाटे यांना चार रानडुकरांची शिकार झाल्याची माहिती मिळाली होती. शिकार केलेल्या रानडुकरांचे मांस विकण्यासाठी  हजारमाची (ता. कराड) येथे आणल्याची माहिती मिळताच तत्काळ रोहन भाटे यांनी याची कल्पना वन्यजीव जिल्हाप्रमुख भारतसिंह हाडा यांना दिली. त्यानंतर वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी, रोहन भाटे यांनी घटनास्थळी धाड टाकली. घटनास्थळी जवळपास 30 ते 35 लोक रानडुकरांचे मांस खरेदीसाठी आले होते. दरम्यान, मांसविक्री सुरू असलेल्या ठिकाणी धाड पडताच मांस खरेदीसाठी आलेले लोक पळून गेले.

मांसविक्री करणाऱया तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपी उसाच्या शेतात व इतरत्र पळून गेले. आरोपी पळून जाताना आपली दुचाकी व चारचाकी वाहने तशीच सोडून गेल्यामुळे आठ दुचाकी व एक चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. रानडुकरांचे 55 किलो मांस, तराजू, चाकू जप्त केले आहेत.

रानडुकरांची शिकार करून त्याची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी आरोपींवर वन्यजीव अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. वन्यजीव अपराध नियंत्रणचे सदस्य तथा मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, सहायक वनसंरक्षक अमरजित पवार, वनक्षेत्रपाल ए. बी. गंबरे, वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सवाखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, वनरक्षक अरुण सोळंकी, कराडच्या वनरक्षकांनी ही कारवाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या