
बॉबी किंवा सिम्मो नावाने ओळखले जाणारे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन उर्फ रॉबर्ट बॅडले सिम्पसन एओ यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वृत्ताची पुष्टी केली असून बॉब सिम्पसन यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा पसरली आहे.
जगभरामध्ये ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा बनवण्यात बॉब सिम्पसन यांनी मोलाचा वाटा उचलला होता. दोन दशकांहून अधिक काळ ते कसोटी क्रिकेटमध्ये सक्रिय होते. निवृत्तीनंतर त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या 1987 ला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा कारनामाही केला होता.
बॉब सिम्पसन यांनी 1957 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता. कसोटीमध्ये त्यांनी 10 शतक आणि 27 अर्धशतकांच्या मदतीने 4869 धावा केल्या. तसेच 71 विकेट्सही घेतल्या. त्यांच्या नावावर त्रिशतकही आहे. 1964 ला इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डवर खेळताना बॉब यांनी आपल्या पहिल्या शतकाचे रुपांतर त्रिशतकात केले होते. 13 तास फलंदाजी करत त्यांनी 311 धावांची खेळी केली होती.
सुरुवातीला त्यांनी संघात अष्टपैलू म्हणून स्थान मिळवले होते, मात्र 1960 च्या दशकामध्ये त्यांना सलामीवीराची भूमिका देण्यात आली आणि त्यांनी ती उत्तमरित्या निभावलीही. 1957 ते 1978 या काळात त्यांनी ऑस्ट्रेलियासाठी 62 कसोटी आणि 2 वन डे सामने खेळले. यातील 39 कसोटी लढतीत त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 12 कसोटी सामने जिंकले. एप्रिल 1978 ला वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला.
An legendary player, captain and coach, Bob Simpson has left a lasting legacy on Australian cricket https://t.co/nwQ3S7OlxK pic.twitter.com/CHBP9HBj2t
— cricket.com.au (@cricketcomau) August 16, 2025
निवृत्तीनंतर 10 वर्षांनी कमबॅक
बॉब सिम्पसन यांनी 1968 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र निवृत्तीच्या 10 वर्षानंतर त्यांनी पुन्हा कमबॅक केले. 1977 मध्ये त्यांनी वयाच्या 41 व्या वर्षी क्रिकेटमध्ये कमबॅक केले तेव्हा त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. ऑस्ट्रेलियाचे अनेक बडे खेळाडू त्यावेळी वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी गेले होते, त्यामुळे बॉब सिम्पसन यांना कमबॅक करावे लागले. कमबॅकनंतर बॉब सिम्पसन यांनी 10 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी दोन शतकही ठोकले.
आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बॉब सिम्पसन यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. 1986 ला ते ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 1987 चा वन डे वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर 1989 ला एशेस सिरिज नावावर केली. तसेच 1995 ला वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकली. 1965 मध्ये त्यांना ‘विज्डन क्रिकेट ऑफ द इयर‘ म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा समावेश आयसीसी ‘हॉल ऑफ फेम‘ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या ‘हॉल ऑफ फेम‘मध्ये करण्यात आला.