ठाणे पालिकेचे माजी नगरसेवक व एकनिष्ठ शिवसैनिक बाळा राऊत यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. बाळा राऊत यांनी गेली 10 वर्षे किसननगर येथून नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व केले. ठाणे महापालिकेचे क्रीडा सभापती, स्थायी समिती सदस्य अशा विविध पदांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांची कामे केली.
अखेरच्या क्षणापर्यंत बाळा राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांना नागपूर संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. सुरुवातीपासून त्यांनी विविध आंदोलने, मोर्चांमध्ये सहभाग घेतला होता. बाळा राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. राऊत यांच्यावर आज वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, सचिव सुरेश मोहिते, उत्तम कापसे, प्रकाश वाघ, अखिलेश काडे, राजू शिरोडकर, प्रशांत सातपुते, संजय दळवी, अमोल हिंगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.