कुलदीप, अर्शदीपला खेळवा! महान फलंदाज ग्रेग चॅपल यांचा टीम इंडियाला सल्ला

लीड्स कसोटीत हिंदुस्थानी गोलंदाजीत वैविध्यतचा अभाव होता. हेच हिंदुस्थानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. त्यामुळे शेन वॉर्ननंतर सर्वोत्तम फिरकीवीर असलेल्या कुलदीप यादवला संघात घ्या आणि सोबतीला अर्शदीप सिंहला कसोटी पदार्पणाची संधी द्यावी असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियाला दिला आहे.

हिंदुस्थान संघाने हेडिंग्लेच्या मैदानात आठ झेल सोडले होते. चॅपल यांनीही आपल्या लेखात हिंदुस्थानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यांनी आपल्या लेखात स्पष्ट म्हटले की, हेडिंग्लेवर हिंदुस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी खूप निराश केले, पण हिंदुस्थानच्या पराभवाचे प्रमुख कारण ते नव्हते. हिंदुस्थानी संघाने आपल्या अडचणी स्वताच वाढवल्या आहेत. सर्वात मोठी चूक तर तो नो बॉल होता, ज्यावर दुसर्या डावाच्या प्रारंभीच हॅरी ब्रुकला जीवदान मिळाले. त्याचबरोबर मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकुर हे तिन्ही उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज जवळजवळ सारखेच होते. हीसुद्धा हिंदुस्थानची सर्वात मोठी अडचण होती.

चॅपल यांनी पुढे लिहिले की, हिंदुस्थानी गोलंदाजीत वैविध्यता नावालाही नव्हती. जसप्रीत बुमराचा अपवाद वगळता उर्वरित वेगवान गोलंदाज एकसारखेच होते. गोलंदाजीत बदल करताच विकेट पडण्याचे सर्वात मोठे कारण असे असते की फलंदाजाला स्थिर व्हायला वेळच मिळत नाही. पण हिंदुस्थानी संघाकडे हा पर्यायच नव्हता. बुमराच्या अनुपस्थितीत अर्शदीपला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळायला हवी. त्याच्या सोबतीला कुलदीप यादवलाही खेळवायला हवे.