माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ पाहून सर्वच अवाक्

कायम वादाच्या भोवऱ्यात अडकणारा हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनोद कांबळी याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विनोद कांबळी मद्यधुंद अवस्थेत दिसत आहे. कांबळीला मद्याची इतकी नशा चढली आहे की त्याला धड उभंही राहता येत नाही आहे. कांबळीची अवस्था पाहून मुंबईकर त्याच्या मदतीला धावले आहेत.

नागरिकांनी आधार देत कांबळीला इच्छितस्थळी पोहचण्यास मदत केली. मद्यधुंद अवस्थेत उभं राहण्यासाठी कांबळीची चाललेली धडपड काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.

कांबळीला हृदयविकाराची समस्या आहे. 2013 मध्ये कांबळीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कमुळे त्याचे प्राण वाचले होते. हृदयात दोन ब्लॉक असल्याने कांबळीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.