‘पुढील 10 वर्ष भाजपला सत्ता द्या’, असे म्हणत माजी केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसला रामराम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू असतानाच प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे नेतृत्व नाकारत माजी केंद्रीय मंत्री आणि केरळ काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एस. कृष्णा कुमार यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाज हुसैन यांनी त्यांचे पक्षामध्ये स्वागत केले.

भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी एस. कृष्णा कुमार यांनी म्हटले की, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री आणि नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केल्यानंतर आता उर्वरित काळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी समर्पित करण्याचा निर्णय मी घेतला. पुढील 10 वर्ष देशाची सत्ता भाजपकडे असावी असे माझे प्रामाणिक मत आहे. सोनिया गांधी आणि आता त्यांचा मुलगा राहुल गांधी याच्या नेतृत्वाविरोधात मी उभा असून नरसिंह राव यांच्या अस्थिंना एआयसीसीमध्ये ठेवण्याची यांनी परवानगी दिली नव्हता आणि त्यांचा अपमान केला होता. सोनिया गांधी यांना हिंदुस्थानी संस्कृती आणि पंरपरांची माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

केरळमध्ये होणार फायदा
एस कृष्णा कुमार यांच्या पक्षप्रवेशामुळे केरळमध्ये भाजपला केरळमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. कोल्लम मतदारसंघात त्यांचे चांगले वर्चस्व आहे.