व्हिडीओ गेम,मोबाईल गेम मधील व्यस्त हात किल्लेबांधणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

व्हिडीओ गेम, मोबाईल गेममध्ये व्यस्त असलेले बच्चे कंपनीचे हात दिवाळीच्या निमित्ताने मातीत मिसळले. टि.व्ही., मोबाईलमध्ये अडकून पडलेल्या मुलांमध्ये दिवाळीच्या निमित्ताने किल्ला बनविण्याचे आकर्षण आजही कायम आहे.

पूर्वी सहामाही परीक्षेच्या वेळीच दिवाळी किल्ला बनविण्याचे नियोजन व्हायचे. परीक्षा संपताच दुसऱ्या दिवसापासून बालगोपाळ किल्ला बांधायला सुरुवात करायचे. दगडगोटे गोळा करून मातीने लिंपून किल्ला तयार करण्यात येत होता. किल्ले बांधणीची ‘क्रेझ’ आजही बालगोपाळांमध्ये आहे. दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधणीच्या निमित्ताने बालदोस्तांना मातीत खेळायला मिळत आहे. बालगोपाळानीही आकर्षक पध्दतीने किल्ले बांधले आहेत. किल्ले त्यावर लक्षवेधक पायऱ्या, किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, आजूबाजूला सैनिक आणि किल्ल्याच्या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर अशा पध्दतीने हा किल्ला बनवला जातो. बालगोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक ठिकाणी किल्ल्यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही किल्ले पहाण्यासाठी किल्लाप्रेमी गर्दी करतात.

आजची लहान मुले मोबाईल गेम आणि व्हिडीओ गेम मध्ये अडकलेली दिसली तरी हे पारंपारिक उपक्रमांची परंपरा बच्चे कंपनीने जपली आहे. सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात इमारतीच्या आवारात हे मातीचे किल्ले आजही त्या परंपरा टिकवून आहेत.