गडावरील गडदुर्गा…

268

दुर्गवीर नितीन सुनीता देविदास पाटोळे,[email protected]

देवी दुर्गा आणि दुर्ग… नावापासूनच अतूट नातं… विविधतेने नटलेल्या आपल्या या महाराष्ट्राला गडकिल्ल्यांचा, दरीडोंगरांचा फार सुंदर मुकुट आहे. या मुकुटाला शिवछत्रपतींनी आणि आपल्या मावळ्यांनी पराक्रमाने सुवर्णसाज चढविण्याचे काम केले.  400 वर्षांपूवीदेखील असलेली संस्कृती आजही गडाच्या आवारात गडाच्या परिसरात पाहायला मिळते. गडकिल्ल्यावर राबता असलेल्या मावळ्यांच्या भावना, श्रद्धा याच गडकिल्ल्याच्या वर असलेल्या देवीदेवतांवर असतात. आजही महाराष्ट्रात राहणाऱया लोकांच्या मूळ देवीदेवता याच गडकिल्ल्यांच्या आवारात आहेत. महाराष्ट्रात असलेल्या गडकिल्ल्यांवर महाराष्ट्राला परिचित नसली तरी या गडदुर्गाची विविध रूपं पाहायला मिळतात.

राजगड…आई पद्मावती

बुलंद, बेलाग आणि बळकट अशा राजगडाला प्रथम स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळाला आहे. स्थापत्याचे उत्तम उदाहरण असलेल्या राजगडावर आई  पद्मावतीचे मंदिर आहे. शिवछत्रपतींनी मुरुंबदेवाचे नामकरण जेव्हा राजगड केले त्यावेळी गडावर पद्मावतीचे मंदिर बांधल्याचे उल्लेख मिळतात. आज मंदिरात तीन मूर्ती पाहायला मिळतात, शिवपूर्व काळातील तांदळा स्वरूपातील मूर्ती असलेली मूर्ती हीच मूळ मूर्ती. मुख्य गाभाऱयात पुजली जाणारी मूर्ती ही भोर संस्थान काळातील आणि डाव्या बाजूला असलेली, शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली मूर्ती आजही पद्मावतीदेवी गडाचे आणि आलेल्या भटक्यांचे रक्षण करत आहे.

रायगड…शिरकाई

महाराष्ट्रात रायगड किल्ला माहीत नसलेली अशी एकही व्यक्ती सापडणे कठीण. शिवछत्रपतींचा देह ज्या ठिकाणी विसावला असा पवित्र किल्ला म्हणजे रायगड. याच रायगडाची शिरकाईदेवी ही मूळ देवता. अष्टभुजा धारण केलेली शिरकाईदेवी आजही आपल्याला पाहायला मिळते. रायगडावरील कोणतेही कार्य शिरकाईला नमन केल्याशिवाय पूर्णच होत नाही. नवरात्रात घट उठल्यानंतर देवीपुढे गोंधळ होत असत. तसेच गडावर कोणताही अभद्र प्रकार झाला की देवीची जत्रा भरविली जायची अशी प्रथा होती. आजही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात श्री शिवराज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी शिरकाईदेवीला मुखवटा चढविला जातो. साडीचोळी नेसवली जाते, अलंकारांचा साज चढविला जातो, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीला साकडे घातले जाते. संपूर्ण मंदिर फुलांनी सजविले जाते.

 मृगगड….सोमजाई

घाटवाटेचा पहारेकरी तसेच निसर्गाने समृद्ध असलेल्या मृगगडावरील श्री सोमजाई देवीची अत्यंत देखीव आणि रेखीव अशी सुंदर मूर्ती आहे. देवीची असलेली प्रसन्न मुद्रा नेहमीच गडावर येणाऱया भटक्यांना आनंद देत असते. गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नसला तरी ही गडावर संवर्धन करणाऱया दुर्गवीरांना पाण्याच्या टाक्यात देवीच्या मंदिराचे कोरीव खांब मिळाले आहे. त्यावरून आपल्याला निश्चित गडावरील देवीचे महत्त्व लक्षात येते.

 रामसेज…महिषासुरमर्दिनी

 दणकट आणि मजबूत असलेला असा किल्ले रामसेज. इच्छाशक्तीच्या जोरावर कित्येक वर्षे औरंगजेबाला झुलवत ठेवणाऱया किल्ले रामसेजवर महिषासुरमर्दिनीची अत्यंत उठावदार आणि सुंदर मूर्ती आहे. देवी मुकुट, देवीच्या कानाची घडण, हातातील शस्त्र, अंगावरील साडीचे नक्षीकाम पाहताक्षणी भुलवून टाकतात.

 कोरीगड…कोराईदेवी

मावळात लोणावळ्याजवळचा कोरीगड, अखंड तटबंदीच्या या किल्ल्यावर कोराईदेवी. सुमारे 4 फूट उंची, सुस्थितीमध्ये ही मूर्ती. आधी फक्त चौथऱयावर उभी असलेली ही देवी आज मंदिराच्या आत विसावली आहे. कोणे एकेकाळी या मूर्तीचे सोन्याचे दागिने होते. नवरात्रीत त्या दागिन्यांनी ती चांगली 9 दिवस मिरवत असे. इंग्रजांच्या काळात कोराईचे सगळे दागिने मुंबईला नेण्यात आले आणि फिरत फिरत ते मुंबादेवीच्या अंगावर आले. आजही मुंबादेवी ते दागिने घालते म्हणतात.

पारगड…आई भगवती

शिवछत्रपतींनी 1674 ते 1676 या काळात पोर्तुगीजांवर जरब बसवण्यासाठी उभारलेला हा पारगड. असे म्हणतात, बांधकाम पूर्ण झाल्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम या गडावर 20 दिवस होता. म्हणून या गडाचे महत्त्व अजून अधोरेखित होते. या गडाची किल्लेदारी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या मुलाकडे सोपवली होती. याच गडावर असलेली ही गडदुर्गा आई भगवती. मंदिराच्या मुख्य बांधकामाला धक्का न लावता अतिशय सुबक आणि देखण्या मंदिराची उभारणी केली आहे.

 सामानगड…आई भवानी

कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा सामानगड नावाचा किल्ला, याच गडावरील असलेली आई भवानी आजही उभी आहे. मंदिराची बांधणी जुनी आहे. स्थानिक लोक देवीला अतिशय सुंदर पद्धतीने साडीचोळी नेसवतात. साडीचोळी रूपातील आई तुळजाभवानीची आठवण करून देते.

मानगड…इंजाईदेवी

रायगडच्या स्वरक्षण साखळीतील प्रथम मान मिळालेल्या मानगडावर इंजाईदेवीचे मंदिर आहे. गावकऱयांनी भावनेपोटी रंगविलेल्या रंगांमुळे देवीचे रूप अजून खुलते. एकेकाळी याच देवीला निसर्गाच्या रूपाचा रंगाचा साज चढविला जायचा. गावातील नवे जोडपे या देवीच्या दर्शनासाठी येते. ही इंजाईदेवी अनेक प्रसंगांतून गाव व गड राखत आहे.

तोरणा….तोरणाजाई

गरुडाचे घरटे म्हणून प्रसिद्ध असलेला तोरणा किल्ला. शिवछत्रपतांनी याच किल्ल्याद्वारे स्वराज्याचे तोरण चढविले. किल्ल्यावर तोरणाई देवीची घुमटी आहे. गडावरील मुख्य देवता महिषासुरमर्दिनी रूपातील मेघजाई असली तरी कोठी दरवाजावरील असलेली ‘तोरणाजाई’ची घुमटी लक्ष वेधून घेते. शिवाजी महाराजांना याच घुमटीच्या ठिकाणी गुप्तधन सापडले होते. म्हणून त्यांनी इथे तोरणाई देवीची घुमटी बांधली असे म्हणतात.

 

आपली प्रतिक्रिया द्या