
1998 साली अपहरण व खंडणीचा गुन्हा करून पसार झालेल्या तबरेज अन्सारी याला गुन्हे शाखेने तब्बल 23 वर्षांनंतर पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी भाईंदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 9 एप्रिल 1998 रोजी तबरेज आणि त्याच्या साथीदाराने अंधेरी येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण केली आणि खंडणी मागितली होती. त्या वेळी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. शिवाय एक आरोपीदेखील पकडला गेला होता, पण तबरेजचा थांगपत्ता लागत नव्हता. ओळख व जागा बदलून तो लपून राहत होता. दरम्यान मालखड पूर्वेकडील पठाणवाडीत तबरेज राहायला आला असल्याची माहिती मिळताच प्रभारी निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या पथकाने 23 वर्षे पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तबरेजला बेड्या ठोकल्या.
























































