मालाड येथे आकाश माईन या तरुणाच्या हत्ये प्रकरणी आणखी चौघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली. त्या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. त्या चौघांच्या अटकेने अटक आरोपीची संख्या दहा झाली आहे.
हैदराबाद येथे राहणारा आकाश हा गेल्या आठवड्यात दसऱ्यानिमित्त आईवडिलांना भेटण्यासाठी मालाड येथे आला होता. शनिवारी तो पत्नीसोबत मोटरसायकलने जात होता. तर त्याचे आईवडील हे रिक्षाने येत होते. तेव्हा रिक्षाने आकाशच्या मोटरसायकलला ओव्हरटेक केला. ओव्हरटेकवरून रिक्षा चालकासोबत भांडण झाले.
भांडणानंतर काहींनी आकाशला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण होत असल्याचे पाहून जीव वाचवण्यासाठी आकाशची आई त्याच्या अंगावर पडली. तरीदेखील हल्लेखोर हे आकाशला मारहाण करत होते. त्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
मारहाणीत जखमी झालेल्या आकाशला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच रिक्षा चालक अविनाश कदमला पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओवरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीत आणखी चौघांची नावे समोर आली. त्या चौघांनादेखील दिंडोशी पोलिसांनी अटक केली.