
नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या घणसोली आगारात बुधवारी सकाळी आगडोंब उसळला. दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला सकाळी 7 वाजता अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे या ठिकाणी उभ्या असलेल्या अन्य चार बसेस आगीच्या विळख्यात सापडल्या. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणालाही दुखापत झाली नसली तरी चार बसेस मात्र जळून खाक झाल्या आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे एनएमएमटी व्यवस्थापनाची एकच पळापळ उडाली.
घटनेची चौकशी करणार
ज्या इलेक्ट्रिक बसला सर्वप्रथम आग लागली ती गेल्या आठ दिवसांपासून घणसोली डेपोत दुरुस्तीसाठी उभी होती. तिच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी या बसला अचानक आग लागली आणि अन्य तीन बसेस आगीच्या विळख्यात सापडले. शॉर्टसर्किटमुळे या बसला आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला देण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया एनएमएमटीचे महाव्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी व्यक्त केली आहे