नातेवाईक महिलेच्या अंत्यसंस्काराहून परतत असताना कार ट्रकला धडकल्याने चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर राजस्थानातील सवाई माधोपूर येथे हा अपघात घडला. राजन (22), मोनिका (24), रेखा (42) आणि धापू प्रजापत (60) अशी मृतांची नावे आहेत. तर पायल प्रजापती, बुलबुल प्रजापती, ज्योती प्रजापत, कृष्णा प्रजापती, अनिता आणि कार चालक शकील खान अशी जखमींची नावे आहेत.
सर्वजण उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये कुटुंबातील एका महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर सर्वजण कारने मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील विक्रमगड येथे घरी परतत होते. मात्र राजस्थानातील सवाई माधोपूर येथे येताच कारचालकाला डुलकी लागली. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि पुढे चाललेल्या ट्रकला जाऊन धडकली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना उपचारासाठी सवाई माधोपूर येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जयपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत.