लोकलमधील बॅग चोरणार्‍या चौघांना बेड्या; 9 लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाईल हस्तगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे प्रवासात रॅकवर किमती ऐवज असणारी बॅग ठेवून मोबाईलमध्ये व्यग्र राहणार्‍या प्रवाशांना टार्गेट करणारा चोरटा व त्याचा भाऊ रेल्वे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. रॅकवरच्या बॅगा चोरून त्यातील किमती ऐवज विकणार्‍या त्या दोघा भावांना राजस्थानातून बेड्या ठोकत त्यांच्याकडून अडीच लाख किमतीचे आठ लॅपटॉप आणि एक मोबाईल हस्तगत केला आहे.

लोकलमध्ये रॅकवर ठेवलेल्या प्रवाशांच्या बॅग चोरणारा व वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरटा राजस्थानमध्ये असल्याची खबर गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत रासम तसेच शशिकांत लोंढे, किशोर सोनवणे, प्रकाश चौगुले आदींच्या पथकाने राजस्थानातील सरानी खेडा गाव गाठून ग्यानसिंग कुशवाह (30) या चोराला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत कुशवाह याने गुह्याची कबुली दिली. रॅकवर बॅग ठेवून मोबाईलमध्ये व्यग्र राहणार्‍या प्रवाशांना टार्गेट करून त्यांच्या रॅकवरच्या बॅगा चोरून नेतो असे त्याने सांगितले. तसेच त्याने चोरलेला ऐवज त्याचा लहान भाऊ विकतो हे समजताच पोलिसांनी आरोपीचा लहान भाऊ राजकुमार कुशवाह (26) यालादेखील अटक केली. या दोघांकडून आठ लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला.  

मुंबईतील दोन चोर गजाआड

राजस्थानमधील दोघांना अटक केल्यानंतर पथकाने मुंबईतून श्रीकांत साबळे ऊर्फ तोहीत आणि करीम पाचू मियाँ या दोघांना पकडून एक लॅपटॉप व एक आयपॅड जप्त करण्यात आला. अशा प्रकारे पोलिसांनी चौघा चोरांच्या मुसक्या आवळून 3 लाख 24 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.