
गडचिरोलीत एका महिलेसह चार जहाल नक्षलवाद्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. नक्षलवाद्यांच्या प्लाटून-7 च्या कमांडरचाही त्यात समावेश आहे. या चारही नक्षलवाद्यांवर अनेक गुन्हे दाखल होते आणि सरकारने त्यांची माहिती देणाऱयांना 22 लाखांचे इनामही लावले होते.
दिनेश ऊर्फ दयाराम नैताम (28), नपुल डुमा मडावी (35), निला पुमरे (34), शरद आतला (26) अशी या नक्षलवाद्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन या नक्षलवाद्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया उपस्थित होते. यंदाच्या वर्षातील गडचिरोलीतील हे पहिलेच आत्मसमर्पण आहे.
या चारही नक्षलवाद्यांना सरकारच्या आत्मसमर्पण योजनेनुसार लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे पोलीस अधीक्षक गोयल यांनी सांगितले. चकमकीत ठार होण्याची भीती आणि हिंसाचाराच्या अस्थिर जीवनाला कंटाळून माओवाद्यांसह जहाल माओवादी आत्मसमर्पणाचा मार्ग निवडत असल्याचे ते म्हणाले.



























































