
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. महालक्ष्मी आणि तुळजाभवानीचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव ट्रकने भाविकांच्या जीपला चिरडले आणि ३० फुटांपर्यंत फरफटत नेले. या भयंकर अपघातात कल्याण-डोंबिवलीतील तिघांसह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली पश्चिमेच्या उमेशनगर परिसरामधील शेवंता हाईट्स इमारतीत राहणारे केकाणे आणि गुप्ता कुटुंबीयांसह १२ भाविक सलग सुट्ट्या आल्याने तीर्थयात्रेसाठी निघाले होते. कोल्हापूरच्या महालक्ष्मी आणि तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दर्शन घेऊन भाविक पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावरील शरदनगर येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे, कल्याण येथील सोनम अहिरे तसेच परळ येथील आदित्य गुप्ता यांचा मृत्यू झाला, तर कविता तुडस्कर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनावणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव आणि वाहनचालक नवनाथ हिडकिट्टी हे जखमी झाले.
पुनाडे घाटात पाच शिवभक्त जखमी
महाड – रायगड-माणगाव रस्त्यावरील पुनाडे घाटात टेम्पो ट्रॅव्हल रचा भीषण अपघात झाला. या भयंकर अपघातात पाच शिवभक्त जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहिल्यानगरमधील १८ शिवभक्त टेम्पो ट्रॅव्हलरने रायगड किल्ला पाहण्यासाठी गेले होते. किल्ला पाहून झाल्यानंतर सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. ते पुनाडे घाटात आले असता अवघड वळणावर अचानक टेम्पो ट्रॅव्हलरचा ब्रेक फेल झाला.
दोन दुचाकींची समोरासमोर धडक
बोईसर – बोईसर-चिल्हार मार्गावरील वारंगडे हद्दीतील विराज कंपनीच्या हत्ती गेटजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन विचित्र अपघात झाला. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. धीरज सुर्वे असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिकांनी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला वारंवार कॉल केले. मात्र एक तास झाला तरी रुग्णवाहिका आली नाही.

























































