नागपूरजवळील नरखेड तालुक्यातील ममोवाड येथील सेवानिवृत्त शिक्षकाने पत्नी आणि दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. बुधवारी सकाळी ही घटना उजेडात आली. दरम्यान, तीन मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळल्याने पोलीस घातपाताच्या शक्यतेच्या दृष्टीनेही तपास करत आहेत.
घटनेबाबत कळताच पोलीस आणि पोलिसांचे फॉरेन्सिक पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि चारही मृतदेह ताब्यात घेतले. विजय पचोरी (68) असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव असून त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी (55), मुलगा दीपक पचोरी (38) आणि गणेश पचोरी (36) अशी इतर मृतांची नावे आहेत. यातील 3 मृतदेह हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळलेत तर एक मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे तिघांचे हातपाय बांधून त्यांना फाशी दिल्यानंतर चौथ्या व्यक्तीने स्वतः गळफास घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांना घातपाताचाही संशय आहे.