
9 ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने अनेक राज्यांत राज्य परिवहन प्रवास मोफत करण्यात आला आहे. जाणून घेऊयात कुठल्या राज्यात ही सुविधा असणार आहे.
उत्तर प्रदेश- 3 दिवस मोफत प्रवास
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीत महिलांसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. ही सुविधा यूपीएसआरटीसी (UPSRTC) आणि शहरातील बससेवांवर, ग्रामीण आणि शहरी दोन्ही मार्गांवर लागू असेल. प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यभरात अतिरिक्त बसेसही धावणार आहेत.
हरियाणा – महिला आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी मोफत प्रवास
हरियाणामध्ये 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 9 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत महिलांना आणि 15 वर्षांखालील मुलांना मोफत बस प्रवास मिळणार आहे. ही सुविधा राज्यातील अंतर्गत बससेवांसाठी लागू आहे, ज्यामध्ये दिल्ली आणि चंडीगढला जाणाऱ्या बसेसचाही समावेश आहे, असे परिवहन मंत्री अनिल विज यांनी सांगितले.
राजस्थान – दोन दिवस मोफत प्रवास
मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी रक्षाबंधनसाठी दिलेल्या प्रवास सुविधेचा कालावधी 9 आणि 10 ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. राज्यात प्रथमच ही योजना सलग दोन दिवस लागू असणार आहे. राजस्थानमधील सर्व बससेवांवर महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळेल.
मध्य प्रदेश: शहरी बसमध्ये मोफत प्रवास आणि रोख लाभ
भोपाल आणि इंदौर येथील महिलांना 9 ऑगस्ट रोजी शहरी भागात बसमध्ये मोफत प्रवास करता येईल. याशिवाय ‘लाडली बहना योजना’ अंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपयांचे रक्षाबंधन बोनस आणि 250 रुपयांचे सणाचे गिफ्ट दिले जाणार आहे. राज्य सरकारने गॅस सिलिंडर अनुदानासह एकूण 43.9 कोटी रुपये 28 लाखाहून अधिक महिलांना वितरित केले आहेत.
संपूर्ण वर्ष मोफत बस प्रवास देणारी राज्ये
पंजाब, कर्नाटक आणि दिल्ली येथे महिलांना वर्षभर मोफत बस प्रवासाची सुविधा आधीपासूनच आहे. मात्र, दिल्लीमध्ये ही सुविधा फक्त स्थानिक महिलांसाठी आणि डीटीसी (DTC) बसपुरतीच मर्यादित आहे.