अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात चौथी अटक करण्यात आली आहे. शूटर धर्मराज कश्यपचा भाऊ अनुरागच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पुण्यात भंगारचे दुकान चालवणाऱ्या हरीश कुमार बालकरामलाही पोलिसांनी अटक केली आहे.
हरीश कुमार हा धर्मराजचा नातेवाईक आहे. धर्मराज कश्यप आणि शिवप्रसाद याच दुकानात काम करत होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात हरीशचाही सहभाग होता. हरीशनेच बाबा सिद्दीकींवर गोळीबार करणाऱ्या शूटर्सची मदत केली. हरिशनेच शूटर्सना कुर्ल्यात भाड्याचे घर आणि बाईक घेऊन दिली होती.
विजयादशमीच्या दिवशी रात्री सव्वा नऊच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील कार्यालयाबाहेर हत्या करण्यात आली. हरियाणातील कैथल येथील रहिवासी गुरमेल सिंग, यूपीतील बहराइच येथील रहिवासी धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता.