
श्रीरामपूर तालुक्यातील कडीत बुद्रुक येथे वडीतके वस्तीवर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी आणखी एक बिबटया जेरबंद झाला. गेल्या अनेक दिवसांपासून पंचक्रोशीत या बिबट्याने धमाकूळ घातला होता. आता वन विभागाने जेरबंद केलेल्या बिबट्याची संख्या चार झाली आहे.
गळनिंब येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. अनेक दिवसांपासून गोंधवणी, टाकळीभान, उक्कलगाव, गळनिंब, फत्याबाद, कुरणपुर, पिंपळगाव, कडित, चांडेवाडी, ममदापुर परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला होता. बिबट्याने अनेकवेळा हल्लेही केले. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथील धनवाट परिसरातील जगधने यांच्या उसाच्या शेतात 23 फेब्रुवारीला रात्री 9 वाजता बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली होती. 22 फेब्रुवारीलाही रात्री चांडेवाडी येथेही बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकली होती. चांडेवाडी येथे अनेकवेळा दिवसा बिबट्याने दर्शन दिले होते. वनखात्याने सतर्कता दाखवत या भागात पिंजरे लावले होते. आतापर्यंत वनविभागाने चार बिबटे पकडले आहेत.
शनिवारी कडित येथे मछिंद्र वडितके यांच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात सकाळी 6 वाजेच्या दरम्यान बिबट्या जेरबंद झाला. हा बिबटया अनेक दिवसांपासून पिंजऱ्याजवळ घिरट्या मारत होता. वनरक्षक गोसावी यांनी लावलेल्या ट्रॅप कॅमेरात ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ पिंजरात मांस व कोंबडी ठेवली. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यथ आले. याकामी, वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अमोल गोसावी यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांना वनरक्षक एम. एस. इंगळे, वनरक्षक आदिनाथ भोसले, वनरक्षक विक्रांत बुराडे, वनरक्षक सुधाकर घोडके, वनमजुर बी. जी. खराडे घोडके, आर. पी. शेळके, वाहन चालक संजय पंढरे, गणेश शिंदे यांनी मदत केली.



























































