फॉक्सकॉनची हिंदुस्थानात 12,700 कोटींची गुंतवणूक

अ‍ॅपलची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने तामीळनाडूत 1.49 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास 12,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांना सल्ला देत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या आयफोनची निर्मिती हिंदुस्थानात करू नका, असे म्हटले होते. परंतु ट्रम्प यांच्या सल्ल्याकडे कंत्राटी कंपनी फॉक्सकॉन कंपनीने दुर्लक्ष केल्याचे आता समोर आले आहे.

हिंदुस्थानात कारखाने उभारण्याची गरज नाही असेही ट्रम्प यांनी म्हटले होते, तर टिम कूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या बाजारपेठेत विक्री होणारे 50 टक्के आयफोन हे हिंदुस्थानात तयार केले जात आहेत. एअरपॉड्स, अ‍ॅपल वॉच यांसारखी अन्य उत्पादनेदेखील बहुतेक व्हिएतनाममध्ये तयार केली जात आहेत. चीनमध्ये तयार होणारे उत्पादन कमी करण्याचा अ‍ॅपलचा प्रयत्न आहे. जर अ‍ॅपल कंपनीने या वर्षाच्या अखेरपर्यंत अॅपलची असेंब्ली हिंदुस्थानात हलवली, तर 2026 पासून हिंदुस्थानात 6 कोटींहून अधिक आयफोन तयार केले जातील.