फसवणुकीची हद्दच झाली…बनावट दूतावास उभारून चक्क ‘राजदूत’ बनला, आलिशान गाड्या, लाखोंची रोकड जप्त

चक्क बनावट दूतावास उभारून फसवणूक केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली. उत्तर प्रदेश एसटीएफच्या नोएडा युनिटने गाझियाबादमध्ये कार्यरत असलेल्या बेकायदेशीर दूतावासाचा पर्दाफाश केला. या प्रकरणी हर्षवर्धन जैन याला अटक झाली. तो गाझियाबादमधील कविनगर येथील रहिवासी आहे. त्याच्या बेकायदेशीर व बनावट दूतावासातून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम आणि डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली वाहने जप्त केली आहेत.

 हर्षवर्धन केबी 35 कविनगर येथे घर भाडय़ाने घेऊन बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक दूतावास चालवत होता. तो स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोर्गा, पौलविया, लोडोनिया या देशांचा कॉन्सुलर/राजदूत म्हणवून घेत असे. लोकांना फसवण्यासाठी त्याने डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या अनेक गाडय़ांची व्यवस्था केली होती. या सर्व गाडय़ा बनावट होत्या.

गाडय़ा, पैसे जप्त

 कविनगर पोलिसांनी राजनैतिक नंबर प्लेट असलेली चार वाहने, लहान देशांचे 2-12 राजनैतिक पासपोर्ट, परराष्ट्र मंत्रालयाचा शिक्का असलेली बनावट कागदपत्रे,  वेगवेगळ्या देशांचे आणि कंपन्यांचे स्टॅम्प,  44 लाख 70 हजारांची रोख ताब्यात घेतली आहे.