
लातूरमध्ये मालवाहू टेम्पोचालकाने एका व्यापाऱ्याची तब्बल 1 लाख 73 हजारा 600 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याला देण्याची ही रक्कम घेऊन तो फरार झाला आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरुध्द विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्यानदेव कोंडीबा सुरवसे यांनी याबाबतची तक्रार दाखल केली. गुडवील पॉलीप्लास्ट कंपनीमध्ये वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या रविंद्र खामकर (रा. देवळा, ता. अंबाजोगाई) याच्याकडे 123 पीव्हीसी पाईप देण्यात आले होते. गुलबर्गा येथील खाजा बोअरवेल यांना त्यातील 105 पाईप देण्यात आले, त्यांच्याकडून रोख 1 लाख 53 हजार 600 रुपये चालकाने घेतले. पटेल बोअरवेल जावरगी यांना त्याने 18 पाईप दिले आणि त्यांच्याकडून रोख 20 हजार रुपये त्याने घेतले. पैसे घेऊन सायंकाळपर्यंत पोहंचतो असे त्याने सुरवसे यांना सांगितले होते. मात्र, तो परतला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र, तो सापडला नाही. त्याच्याकडे असलेले वाहन औसा रोडवरील थोरमोटे पेट्रोलपंपासमोर सोडून तो पसार झाला. आपली फसवणूक करून टेम्पोचालक फरार झाल्याचे लक्षात आल्यावर सुरवसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक रवींद्र खामकरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
























































