
प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण आदेश देत मुलुंड पोलिसांना बर्दापूरकर यांच्याविरुद्ध फसवणूक तसेच गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर आता अक्षय बर्दापूरकर यांच्यासमवेत त्यांच्या सहकाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आलेला आहे.
अक्षय बर्दापूरकर यांच्या ‘प्लॅनेट मराठी’ च्या माजी भागीदार सौम्या विलेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. विलेकर यांनी दाखल केलेल्या फौजदारी रिट याचिकेवर (क्रमांक ४१७०/२०२५) सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा आदेश दिलेला आहे. विलेकर यांनी केलेल्या आरोपानुसार, (३ ऑक्टोबर २०२३) बनावट ‘रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप डीड’ तयार करण्यात आला होता. तसेच या बनावट करारावर त्यांच्या फोटोसह खोट्या सह्यांचा वापर करण्यात आला होता. याच बनावट कागदपत्रांच्या आधारांवर अक्षय बर्दापूरकर यांनी विविध बँकांकडून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतले होते. तसेच या बनवाट कागदपत्रांच्या आधारावर बौद्धिक संपत्तीशी निगडीतही अनेक गैरव्यवहार करण्यात आले होते. विलेकर यांची कोणतीही परवानगी न घेता केलेले हे व्यवहार आता अक्षय बर्दापूरकर यांच्या अंगलट आले आहेत.