
सामना प्रतिनिधी, मुंबई
पश्चिम रेल्वेने कोकणात सोडलेल्या गणपती स्पेशल गाडीच्या तिकिटांची बुकिंग शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या आधीच सुरू झाल्याचा विचित्र प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. पश्चिम रेल्वेने नऊ गणपती स्पेशल गा़ड्या सोडल्या असून त्यापैकी ट्रेन क्र. ०९००७ या गाडीचे बुकिंग सकाळी ७.२१ वाजताच सुरू झाल्याचे उघडकीस आल्याने या प्रकरणात एका डाटा सुपरवायझरला बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आयआरसीटीसीची ऑनलाइन तिकीट बुकिंग यंत्रणा भक्कम करण्यात येणार आहे.
कोकणच्या चाकरमान्यांना गणपती सणाचे वेध लागले असतानाच मध्य रेल्वेने १३२ तर पश्चिम रेल्वेने ४० विशेष फेऱया सोडल्या आहेत. या गाडय़ांपैकी नऊ गणपती स्पेशल (ज्यात सहा पश्चिम रेल्वे तर तीन कोकणच्या गाडय़ा) गाडय़ांची बुकिंग शुक्रवार, २० जुलै सकाळी ८ वाजता सुरू होणार होती. त्यापैकी त्यापैकी ट्रेन क्र. ०९००७ या गाडीचे बुकिंग सकाळी ७.२१ वाजताच सुरू झाले. विशेष म्हणजे सकाळी ७.१० वाजता देशभरातून १३५ तिकिटे ऑनलाइन बुक झाल्याचे उघड झाले आहे. या पैकी ८ सप्टेंबर रोजीची १३ तिकिटे, १५ सप्टेंबरची ३ तिकिटे तर १० सप्टेंबरची ११९ तिकिटे अशी १३५ तिकिटे बुक झाली आहेत. त्यानंतर प्रवासी आरक्षण खिडक्यांतील उरलीसुरली तिकिटे अवघ्या काही मिनिटांत संपली आहेत.
























































