उद्योजकाचा डीपफेक वापरून केली डॉक्टरची फसवणूक

हिंदुस्थानातील एका प्रसिद्ध उद्योगपतीचा डीपफेक वापरून ठगाने महिला डॉक्टरची 7 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार या महिला डॉक्टर आहेत. एप्रिल महिन्यात रिल्स पाहत होत्या. रिल्समध्ये एक प्रसिद्ध उद्योगपती हे एका ट्रेंड गुरूचे कौतुक करत असल्याचे दिसले. त्या जाहिरातीखाली एक लिंक होती. त्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जोडले गेले. त्या ग्रुपमध्ये ट्रेडिंगची माहिती दिली जायची. त्यावर विश्वास ठेऊन त्याने त्या ट्रेंड गुरूच्या कंपनीची माहिती सर्च केली. त्यानंतर एका महिलेने त्यांना कंपनीच्या वेबसाईटवरून ऍप्स डाऊनलोड करण्यास सांगितले. ते ऍप्स डाऊनलोड केल्यावर त्याचे बँक खाते ऍप्सशी जोडले गेले. त्यात त्यांना आणखी पैसे गुंतवण्यास भाग पाडले जात होते. त्याने विश्वास ठेऊन सात लाख रुपयांची गुंतवणूक केली. जून महिन्यात तक्रारदाराला 30 लाख रुपये नफा झाल्याचे ऍप्सवर दिसत होते. त्याने एका महिलेला पैसे काढण्यासाठी विचारणा केली. तिने पैसे काढण्यास नकार दिला. सेवा शुल्क म्हणून आणखी 3 लाख 43 हजार रुपये भरण्यास सांगितले. पैसे भरले नाही तर ते खाते बंद होईल असे त्यांना सांगितले. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्यामुळे त्याने चौकशी केली. इंस्टाग्रामवर पाहिलेला तो उद्योगपतींचा व्हिडीओ डीपफेक असल्याचे त्याच्या लक्षात आले.